रत्नागिरीः शिंदे-फडणवीस सरकारच्या मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रत्नागिरी येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) आणि महाविद्यालयास संलग्नित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 430 रुग्ण खाटांचे जिल्हा रुग्णालय (Ratnagiri District Hospital) स्थापन करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली असून या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. रत्नागिरीमध्ये 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आगामी वर्षीपासून सुरू करण्यासाठी मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी 522 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली असून दिल्ली येथे परवानगीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती मंत्रिमंडळातील नूतन मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी दिली.
आज मा. मुख्यमंत्री @mieknathshinde साहेबांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. यास्तव ₹ ५२२ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
— Uday Samant (@samant_uday) August 10, 2022
झूम मिटींगद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रथमदर्शनी जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय व मनोरुग्णालय इमारत आवारात हे शासकीय महाविद्यालय सुरू केले जाणार आहे.
येथील मनोरुग्णालयाची 14 एकर जागा असून, त्यातील चार एकर जागेत नूतन इमारत व होस्टेल उभा करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक 20 एकर जागा देण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय व मनोरुग्णालय इमारतीच्या किरकोळ दुरुस्तीसाठी 25 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. नवीन इमारतीसाठी 114 कोटी 77 लाख, यंत्रसामग्रीसाठी 120 कोटी असे 259 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचार्यांच्या वेतनापोटी तीन वर्षांसाठी 105 कोटी रुपये, 31 कोटी आवर्ती खर्च व अन्य मिळून एकूण 522 कोटीच्या निधीला मंजुरी देण्यात आली असल्याचे माहितीही मंत्री उदय सामंत यांनी दिली. हे वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत तीन वर्षात पूर्ण करण्याचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय मंत्रिमंडळात हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या रुग्णालयामुळे जिल्ह्यातील डॉक्टरांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरीला शैक्षणिक हब बनवण्याचे आपले स्वप्न असून त्या दृष्टीने सुरु असलेले उपक्रम पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असून वैद्यकीय महाविद्यालयामुळे रत्नागिरीच्या शैक्षणिक विकासालाही चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर 14 ऑगस्टपासून उदय सामंत जिल्हा दौर्यावर येत आहेत. आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघाचा यावेळी प्राधान्याने आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर चिपळूण येथे वाशिष्ठीची पाहणी करून अधिकार्यांबरोबर चर्चा केली जाणार आहे. संगमेश्वर येथून थेट रत्नागिरीत येऊन मारुती मंदिर येथील शिवसृष्टीचेही उद्धघाटन केले जाणार आहे.याचवेळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणात उभारण्यात आलेल्या स्मृतिशिल्पाचा शुभारंभही याच दिवशी केला जाणार आहे.