भास्कर जाधवला गाडल्याशिवाय राहणार नाही, रामदास कदम यांनी दंड थोपटले; खेडमधली उद्याची सभा खरच ऐतिहासिक ठरणार?

| Updated on: Mar 18, 2023 | 12:31 PM

उद्धव ठाकरे यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा खेड येथेच होत आहे. त्यापार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

भास्कर जाधवला गाडल्याशिवाय राहणार नाही, रामदास कदम यांनी दंड थोपटले; खेडमधली उद्याची सभा खरच ऐतिहासिक ठरणार?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

खेड : रविवार ( 19 मार्च ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेड येथील गोळीबार मैदान येथे जाहीर सभा होत आहे. त्या सभेचे जोरदार तयारी सुरू असल्याचे सांगत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. रामदास कदम यांनी खेड येथे होणारी सभा ऐतिहासिक सभा होईल. आम्ही फक्त मतदार संघातील लोकांना बोलवणार आहे. अफझल खान कसा सगळं सैन्य घेऊन महाराष्ट्रावर चालून आला होता तसं संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना उद्धव ठाकरे घेऊन आले होते. मातोश्रीवर जोरदार बैठका घेतल्या जात होत्या. प्रत्येकाला विचारलं जात होतं तू किती माणसं आणणार? त्यामुळे आमच्या सभेला त्यांच्यापेक्षा जास्त गर्दी राहील असा दावा कदम यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदार यांनी उठाव केला नसता तर आम्ही राजकारणातून संपलो असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले पाहिजे म्हणत उद्याची सभा ऐतिहासिक ठरेल असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांनी आम्हाला संपविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मला गुहागर येथे उद्धव ठाकरे यांनीच पाडले. मी तिथे गाफील राहिलो असे रामदास कदम यांनी सांगत भास्कर जाधव यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. योगेश कदमला पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले पण आम्ही पुरून उरलो.

हे सुद्धा वाचा

योगेश कदमचे तिकीट कापण्यासाठी प्रयत्न झाले पण ते माझ्यापुढे यशस्वी झाले नाही. पण आता 2024 ला भास्कर जाधवला आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही. बांडगूळ आहे भास्कर जाधव. त्याची लायकी नाही तो नाच्या आहे अशी जहरी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

रामदास कदम म्हणाले भास्कर जाधवला माझे खुलं चॅलेंज आहे. 2024 ला तू आमदार होऊन दाखव. काहीही झालं तरी मी भास्कर जाधवला आमदार होऊ देत नाही असा इशाराच कदम यांनी भास्कर जाधव यांना दिला आहे.

योगेश कदमला पाडण्यासाठी खूप प्रयत्न झाले पण त्याच्या शंभर पिढ्या जरी आल्या तरी योगेश कदम संपणार नाही, आम्ही ठरविले आहे भास्कर जाधव हा नाच्या असून त्याला मी राजकारणातून गाडल्याशिवाय राहणार नाही असेही रामदास कदम म्हणाले आहे.

एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेपूर्वी रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल करत राजकीय वातावरण चांगलेच तपावले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा कशी होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.