रत्नागिरी | 16 जानेवारी 2024 : आंबा पिकतो, रस गळतो… कोकणचा राजा म्हणा किंवा फळांचा राजा, एकचं नाव समोर येतं ते म्हणजे आंबा. खवय्यांची पहिली पसंती तर हापूस आंब्यालाच. आता या हापूस प्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. रत्नागिरी तालूक्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी रवाना झाली आहे. त्यामुळे लवकरच आंबाप्रेमींना आवडत्या, मधुर फळाची चव चाखता येणार आहे.
रत्नागिरीतील गणेशगुळे येथील आंबा बागायतादार दीपक शिंदे यांच्या बागेतील आंब्याची पेटी रवाना झाली आहे. हापूस आंब्याची ही पेटी अहमदाबादच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल झाली असून या पेटीला 25 हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान बदलत्या वातावरणावर मात करत कठोर मेहनत घेतल्याने आंब्याचं चांगलं पीक शेतकऱ्याच्या हाती आलं आहे.
आंब्याचा तुरंबा काळा पडत असल्याने आंबा उत्पादक शेतकरी हवालदील
दरम्यान नांदेड जिल्ह्यात पूर्वीच विविध रोगांच्या प्रादुर्भावाने शेती पिकाचं मोठ नुकसान झाले आहे. असं असतानाच आता आंब्याच्या झाडावरदेखील रोगाचा प्रादुर्भाव होत आहे . आंब्याच्या झाडाची तुरंबाफुले गळुन पडत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सततच्या वातावरण बदलामुळे हा त्रास जाणवत असल्याचे शेतक-यांनी सांगितलंय. आंब्याचा पिवळा तुरंबा काळा पडत असून ऐन मोड उगवणीच्या काळात तुरंबाच गळुन पडत असल्याने आंब्याचा भार कमी होणार आहे. त्याचा थेट फटका आता उत्पादनावर होणार असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा गावठी आंब्याला बसतोय फटका
मनमाड, नांदगावंसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अधून मधून होत असलेला अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा रब्बी पिका सोबत गावठी आंब्याला देखील बसत आहे. अनेक झाडांना मोहर लागलेला नाही , आणि ज्या झाडांना मोहोर लागलाय, तो गळून पडत आहे. शिवाय आंब्यावर रोगाचा प्रादुर्भाव देखील होत असल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
पोलादपूर तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका, आंबा व काजू बागायतदार चिंतेत.
वेधशाळेने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्याला अनुसरून पोलादपूर तालुक्यासह शहरामध्ये गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंब्याचा व काजूच्या पिकासह इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या मंगळवारी शहरात जवळपास 2 तासाहून अधिक वेळ जोरदार पर्जन्यवृष्टी केल्याने बाजारपेठ सह बसस्थानाक परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला.
सध्या आंबा व काजूचे पीक चांगल्या प्रकारे बहरून आले असून अवकाळी पावसामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. ऐन फुलोऱ्यावर आलेली आंबा, काजू पीक धोक्यात आली आहेत. अवकाळी पाऊस पडल्याने किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तर आंबा आणि काजु पिकाला आलेला मोहोर गळून पडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
बीड जिल्ह्यात मागील आठवड्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. याचाच फटका आंबा पिकांना बसला आहे. थंडीमुळे मोहोर गळती झालीय. त्याच बरोबर करपा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कृषि विभागाने पंचनामा करून आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.