ज्यांच्या घरी एसीबीची धाड पडली ते राजन साळवी नेमके कोण? त्यांच्यावर आरोप काय?

| Updated on: Jan 18, 2024 | 1:49 PM

Who is Rajan Salvi : ठाकरे गटाचे नेते, राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर आज एसीबीने धाड टाकली. राजन साळवी यांच्यावर नेमके आरोप काय? राजन साळवी यांची राजकीय पार्श्वभूमी काय? धाडीनंतर साळवी नेमकं काय म्हणाले? त्यांची पुढची भूमिका काय? वाचा सविस्तर...

ज्यांच्या घरी एसीबीची धाड पडली ते राजन साळवी नेमके कोण? त्यांच्यावर आरोप काय?
माझी चौकशी करा. घरावर धाडी टाका. मला अटक करा. पण मी उद्धवसाहेबांना सोडणार नाही. काहीही झालं तरी मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार. त्यांची साथ कधी सोडणार नाही, असं राजन साळवी यांनी सांगितलं.
Follow us on

मनोज लेले, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी,| 18 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या घरावर एसीबीने धाड टाकली आहे. राजन साळवी यांच्या घरी, त्यांच्या भावाच्या घरी आणि हॉटेलवर एसीबीने धाड टाकली आहे. त्यांच्या घरी सकाळपासून कसून चौकशी केली जात आहे. उत्पन्नापेक्षा 118 टक्के जास्त संपत्ती असल्याचा आरोप साळवी यांच्यावर आहे. याच प्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे. याआधीही सहा वेळा साळवी यांची चौकशी झाली आहे. तर आज एसीबी त्यांच्या घरी चौकशी करत आहे. आमदार राजन साळवी यांना उद्धव ठाकरे यांचा फोन आला. तुमच्या लढाईत सर्वजण सोबत असल्याचं ठाकरे म्हणाले.

राजन साळवी कोण?

राजन साळवी हे कट्टर शिवसैनिक आहेत. रत्नागिरीतील राजापूर मतदारसंघाचे ते आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांचे ते खंदे समर्थक आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. तेव्हा साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं. विद्यार्थीसेनेपासून त्यांनी राजकीय क्षेत्रात काम सुरु केलं. राजन साळवी हे शिवसेनेचे रत्नागिरीतील पहिले नगराध्यक्ष आहेत. 2009, 2014, 2019 सलग तीनवेळा ते राजपूरमधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले.

आरोप काय?

मागच्या काही दिवसांपासून एसीबी राजन साळवी यांची चौकशी करत आहे. साळवी यांच्या मालमत्तेची चौकशी केली जात आहे. राजन साळवी यांचं उत्पन्न, खर्च आणि मालमत्ता याची चौकशी केली जात आहे. एकूण उत्पन्नाच्या 118 टक्के जास्त संपत्ती साळवी यांच्याकडे असल्याचा आरोपपत्रात उल्लेख आहे. या प्रकरणी आतापर्यंत सहावेळा साळवी यांची चौकशी झाली आहे. 2009 पासून आतापर्यंत आमदार निधीतून आलेला निधी आणि खर्च तसंच विकासकामं यांची चौकशी केली जात आहे.

साळवींच्या घरी एसीबीची धाड

आमदार राजन साळवी यांच्या घरी गेल्या पाच तासापासून एसीबीची टीम चौकशी करत आहे. आमदार राजन साळवी यांच्या घराच्या बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा आहेत. राजन साळवी यांच्यावर कारवाई झाल्यास त्यांच्या मागे उभे राहण्यासाठी काय जमले आहेत. साळवी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली जात आहे. तरआमदार राजन साळवी आता हा कार्यकर्त्यांना भेटत आहेत.

साळवी काय म्हणाले?

एसीबीने धाड टाकल्यावर राजन साळवी यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. थोड्या वेळा आधी उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला. उद्धवजी ठाकरे यांनी मला धीर दिला. संपूर्ण शिवसेना पक्ष तुमच्या पाठीशी आहे, असं ते म्हणाले. माझ्या मुलावर आणि पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. कोणत्याही क्षणी मला अटक होऊ शकते. पण या अटकेला मी घाबरत नाही. काहीही झालं तरी मी उद्धवजींची साथ सोडणार नाही, असं साळवी म्हणाले.