‘घटना घडत असते, पोलीस देव नसतो’,’ शिंदेंच्या शिलेदाराचं बीड प्रकरणावर मोठं वक्तव्य  

| Updated on: Dec 31, 2024 | 5:47 PM

वाल्मीक कराड यापूर्वीच जर शरण आला असता तर मोर्चे, आक्रोश झाला नसता . गृहमंत्री काय गावागावत जाऊन पहारा देणार आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

घटना घडत असते, पोलीस देव नसतो, शिंदेंच्या शिलेदाराचं बीड प्रकरणावर मोठं वक्तव्य  
Follow us on

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला आता 22 दिवस झाले आहेत. या प्रकरणात वाल्मिकी कराडवर देखील आरोप करण्यात आले होते. अखेर घटनेच्या 22 व्या दिवशी तो शरण आला, त्याने पुण्यात सीआयडीसमोर शरणागती पत्कारली. वाल्मिकी कराड याने आत्मसमर्पण केल्यानंतर त्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले संजय गायकवाड? 

गुन्हेगाराला जात धर्म नसतो, आरोपीचे फोटो कोणासोबतही असतील, कोणत्याही पक्षाच्या नेत्यांसोबत जरी असतील तरी कोणालाही सोडणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं आहे. वाल्मीक कराड यापूर्वीच जर शरण आला असता तर मोर्चे, आक्रोश झाला नसता . गृहमंत्री काय गावागावत जाऊन पहारा देणार आहेत का?  गृहमंत्री काय अंतर्यामी आहेत का? घटना घडत असतात, पोलीस पण देव नसतो.  गुन्हेगार हा माणूसच आहे, यंत्रणांपेक्षा चारपट अधिक विचार करून तो गुन्हा करतो. त्यामुळे गुन्हेगाराला पकडायला वेळ लागतो, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या प्रकरणात जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, त्यांना पालकमंत्रिपद देऊ नये अशी मागणी देखील होत आहे. यावर देखील गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  मला वाटत नाही की मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे म्हणून, असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  मागच्या सरकारमधील अपूर्ण योजना आणि आमच्या राहिलेल्या योजना पूर्णत्वास नेण्याचा संकल्प आहे. याशिवाय टेक्सटाइल पार्क, सिंचन प्रकल्प, उद्योग हे सगळ पूर्ण करण्याचा संकल्प आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनात सगळ्या योजनांबाबत निर्णय घेतले जातील, महिला आणि शेतकऱ्यांसंदर्भात निर्णय घेऊ, मागील सरकारमधील योजनाचा लाभ सगळ्यांना मिळेल. महायुतीने ज्या घोषणा केल्या आहेत त्या सगळ्या पूर्ण होतील.