नागपूर | 12 डिसेंबर 2023 : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस. विधान परिषदेच्या सभागृहात आज अनेक सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. आमदारांना सभागृहात प्रश्न मांडता यावेत यासाठी विविध संसदीय आयुधांचा उपयोग करता येतो. मात्र, काही कारणाअभावी, वेळेअभावी त्यांना आपले प्रश्न मांडता येत नाही. यासाठी विधीमंडळातील औचित्याचे मुद्दे आणि विशेष उल्लेख ही संसदीय आयुधे महत्वाची मानली जातात. या आयुधाद्वारे विचारण्यात आलेल्या प्रश्नांना मंत्री लागलीच उत्तरे देतात. याच आयुधांच्या माध्यमातून विधान परिषदेत रेकॉर्ड ब्रेक काम झाले.
विधान परिषदेत तब्बल 14 औचित्याचे मुद्दे आणि 25 विशेष उल्लेख मांडण्यात आले. हे एक प्रकारे रेकोर्ड ब्रेक कामच झाले असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात सांगितले. उपसभापती गोऱ्हे यांनी दिलेल्या माहितीनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी आणखी एक मुद्दा मांडला.
नागपूर हिवाळी अधिवेशनात राष्ट्रकुल संसदेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी अभ्यास वर्गाचे आयोजन केले जाते. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे विविध संसदीय आयुधे, विधिमंडळ समिती आणि अर्थविषयक समिती कामकाज या विषयावर मार्गदर्शन होते. त्याच्या भाषणाने आमदार अमोल मिटकरी प्रभावित झाले. अमोल मिटकरी यांनी सभागृहात हा मुद्दा मांडला.
संसदेची विविध आयुधे आणि संसदेच्या विविध चर्चा असतील, पुरवणी मागण्या यावर आमचा अजून अभ्यास झालेला नाही अशी प्रामाणिक कबुली त्यांनी दिली. त्यामुळे आमचा अभ्यास घेण्यासाठी एक तासाचा अभ्यास वर्ग घ्या. या अभ्यास वर्गासाठी माझ्यासह किरण सरनाईक, प्रज्ञा सातव, अभिजित वंजारी, अरुण लाड, धीरज लिंगाडे सुधाकर अडबाले या आमदारांनी नावे दिली आहेत. असे त्यांनी सांगितले.
आमदार अमोल मिटकरी यांची ही मागणी लक्षात घेऊन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रश्न किंवा मार्गदर्शन यापेक्षा प्रोसिजर माहिती व्हावी. प्रशिक्षण म्हणण्यापेक्षा सातत्याने तुमच्या मनात जे काही प्रश्न असतात. अडचणी असतात त्याचे निराकरण करण्यासाठी अधिकारी यांच्यासोबत एका तास चर्चा करा. अधिकारी कमी पडले तर अनुभवी सदस्य यांच्याकडून अधिक मार्गदर्शन घेऊ शकतो असे सांगितले.
मी सुद्धा विनंती समितीची अध्यक्ष आहे. त्यामध्ये जनरल मोटरसारखे विषय आले तर आपण बैठक घेऊन टोकापर्यंत जाऊन निर्णय करू शकतो. परंतु, बरेच लोक विनंती समितीकडे अर्ज देत नाहीत. त्या बैठकीचा फोलोअप आमच्याकडून होत नाही आणि तुमच्याकडूनही होत नाही. त्यामुळे असे काही विषय असतात त्याचे निराकरण करण्यासाठी दोन अधिकारी यांचे सत्र ठेवू, असे उपसभापती यांनी जाहीर केले.