प्रसिद्ध ‘रील स्टार’आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अन्वी कामदार असे तिचे नाव असून ती मुंबईतील रहिवासी आहे. अन्वी ही तिच्या मित्र मैत्रिणींसह रायगड मधील माणगाव आली होती. सात जणांचा हा ग्रुप धबधब्यावर आला होता. मात्र त्यावेळीच तिचा पाय घसरून दरीत कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. 27 वर्षांची अन्वी ही उच्च शिक्षित होती, तिने सीए केलं होतं. तिच्या अकस्मात आणि दुर्दैवी मृत्यूमुळे अनेकांना मोठा धक्का बसला असून हळहळ व्यक्त होत आहे.
माणगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मुलुंड येथे राहणारी अन्वी पावसाळ्यात मित्र- मैत्रिणींसोबत फिरायला गेली होती. व्यवसायाने सीए असलेली अन्वी तिच्या सोशल मीडिया रिल्ससाठी प्रसिद्ध होती.
नेमकं काय झालं ?
अन्वी आणि तिच्या मित्रांचा, सात जणांचा हा ग्रुप फिरायला गेला. तेथे एका कड्यावर अन्वी ही रील्स बनवत होती. मात्र तेवढ्यात पाय घसरून तिचा तोल गेला अन् ती ३०० फूट खोल दरीत कोसळली. यावेळी तिच्यासोबत तिचे सहा सहकारी देखील होते. पण, कोणालाही धोक्याबाबत तिला सूचना देता आली नाही. घटनेनंतर पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी येऊन शोधमोहीम सुरु केली. दरी खोल असल्याने बचाव कार्यात अडथळा येत होता. त्यानंतर तब्बल 6 तासांच्या रेस्क्यूनंतर अवनीला बाहेर काढण्यात आलं. ती गंभीर जखमी झाली होती. तिला तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
अन्वी कामदारच्या मृत्यूनंतर पर्यटकांना आवाहन
रील स्टार अन्वी कामदार हिच्या दुर्दैवी मृत्यूनंतर माणगावचे पोलिस निरीक्षक, तहसीलदार आणि इतर स्थानिक अधिकाऱ्यांनी पर्यटक आणि आसपासच्या लोकांना आवाहन केले आहे. लोकांनी जबाबदारीने पर्यटनाचा आनंद घ्यावा. प्रवास करताना सुरक्षिततेला प्राधान्य द्या. पर्यटनस्थळी धोकादायक वर्तन टाळावे, अशा सूचना देत लोकांना सुरक्षित राहण्याचे व जीवाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रीलच्या नादात अनेकजण आपला जीव गमावतात. अशीच घटना अन्वीसोबत घडली आहे. एक रील करण्यासाठी तरुण-तरुणी कोणत्याही थराला जाताना दिसतात, जीवावर उदार होऊन जोखीम पत्करतात. पुण्यात काही दिवसांपूर्वीच एक तरुणी मित्राचा हाताच्या सहाय्याने एका बिल्डिंगच्या खाली लटकत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.