मुंबईः पंजाबचे आम आदमी पक्षाचे (AAP) होणारे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी शपथविधीपूर्वीच 122 माजी मंत्र्यांची सुरक्षा काढून घेण्याचे निर्देश दिलेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी माजी मंत्री, आमदारांची सुरक्षा काढावी. त्यांच्या सुरक्षेचा फेरआढावा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. पंजाबचे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शनिवारी संगरूर गुरुद्वारा साहिबमध्ये जाऊन दर्शन घेतले. यावेळी ते म्हणाले की, पोलीस नेत्यांच्या घराबाहेर तंबू ठोकून त्यांची सुरक्षा करत आहेत. मात्र, त्यांना त्यांचे काम करू द्यावे. राज्यातील पावणेतीन कोटी लोकांना सुरक्षेची गरज आहे. सध्या पोलीस ठाणे ओस पडले आहेत. आम्ही पोलिसांकडूनच हे काम करूवून घेऊ. त्यामुळे काही लोकांच्या सुरक्षेपेक्षा मला पंजाबच्या जनतेची सुरक्षा महत्त्वाची वाटते, असा निर्धार त्यांनी आपल्या निर्णयानंतर व्यक्त केला होता. या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे. महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
रोहित पवारांचे ट्वीट काय?
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निर्णयानंतर रोहित पवार यांनी एक ट्वीट करून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना साकडे घातले आहे. त्या ट्वीटमध्ये आमदार पवार म्हणतात की, माजी मंत्री, आमदार यांची सुरक्षा काढण्याचा पंजाबचे नियोजित मुख्यमंत्री भगवंत मान यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे पोलिसांवरचा ताण कमी होऊन विविध गुन्ह्यांच्या तपासाला मदत होणार असेल, तर राज्यातही अशा प्रकारे नेत्यांच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्याबाबत विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता या निर्णयानंतर राज्य सरकार खरेच महाराष्ट्रातील माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा काढणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
माजी मंत्री, आमदार यांची सुरक्षा काढण्याचा पंजाबचे नियोजित मुख्यमंत्री भगवंत मान यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळं पोलिसांवरचा ताण कमी होऊन विविध गुन्ह्यांच्या तपासाला मदत होणार असेल तर राज्यातही अशा प्रकारे नेत्यांच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्याबाबत विचार व्हावा!@Dwalsepatil
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 13, 2022
या नेत्यांची सुरक्षा गेली?
पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या या निर्णयानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह त्यांची पत्नी नवज्योत कौर, मनप्रीत सिंग बादल, भारतभूषण आशू, रझिया सुलताना, परगट सिंग, राणा गुरजीत सिंग, सुखबिंदर सिंग सरकारिया, संजय तलवार, नथू राम, दर्शन लाल, धरमबीर अग्निहोत्री, अरुण नारंग, तरलोचन या नेत्यांची सुरक्षा जाणार आहे. मात्र, दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशानुसार ज्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे, ती तशीच कायम राहणार आहे.
Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?