निवासी शाळेत दारंच नाहीत, खिडक्यांना गाद्या लावतो… पालकांनाही सांगू देत नाहीत, विद्यार्थिनींचे हेही अश्रू वाया जाणार?

| Updated on: Sep 01, 2022 | 5:35 PM

या सगळ्या मागण्या घेऊन विद्यार्थिनींनी आज सहाय्यक आयुक्तांनाच घेराव घातला. आयुक्तांनीदेखील मुलींनी याआधीही निवेदन दिल्याचं कबूल केलं. आता माध्यमांसमोर मुलींनी अन्यायाला वाचा फोडल्यानंतर तरी ही शाळा राहण्यासाठी आणि शिकण्यासाठी सोयीची होईल, एवढीच अपेक्षा...

निवासी शाळेत दारंच नाहीत, खिडक्यांना गाद्या लावतो... पालकांनाही सांगू देत नाहीत, विद्यार्थिनींचे हेही अश्रू वाया जाणार?
निवासी शाळेतील विद्यार्थिनी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

हिंगोलीः सरकारी निवासी शाळेत अशीच स्थिती असते असं म्हणत दुर्लक्ष करायचं की या मुलींना न्याय मिळवून द्यायचा, हे ठरवण्याची वेळ आली आहे. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी (Kalamnuri) येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या निवासी शाळेतल्या गैरसोयींचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. गुणवत्तेनुसार येथे मुलींना प्रवेश मिळतो खरा, पण एकदा प्रवेश मिळाल्यावर प्रचंड गैरसोयींना तोंड द्यावं लागतं. 180 विद्यार्थ्यांमागे फक्त दोनच शिक्षक शिकवत आहेत. या मुलींच्या होस्टेलमध्ये खोल्यांत पंखा, लाईट सुस्थितीत नाहीत. वीजेच्या तारा उघड्याच आहेत. एवढंच काय तर काही खोल्यांना दारं नाही. रात्रीच्या वेळी दारांना गाद्या लावून झोपण्याची वेळ विद्यार्थिनींवर आली आहे. मुलींना झोपण्यासाठी दिल्या जाणाऱ्या गाद्याही अत्यंत घाणेरड्या असल्याचा आरोप मुलींनी केलाय.

जेवणही निकृष्ट

शाळेत मिळणाऱ्या जेवणाबाबत आम्ही पाहणी केली तर अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जेवणात वापरले जाणारे बटाटे कांदे चक्क जमिनीवर फेकलेले होते. जेवणात जे धान्य वापरले जाते त्या धान्यामध्ये किडे दिसले. विद्यार्थिनींना दिलेली केळीही खाण्याजोगी नव्हती. पाण्याचे फिल्टरही फक्त शोभेसाठी आणून ठेवले. अंघोळीही थंड पाण्याने कराव्या लागतात, असे विद्यार्थिनींनी सांगितलं.

शिक्षकांनी ऐकलंच नाही?

निवासी शाळेतील या गैरप्रकाराबद्दल अनेकदा निवेदन देऊनही वॉर्डन आणि प्रशासनानं लक्ष घातलं नाही, अशी तक्रार इथल्या विद्यार्थिनींनी केलीय. 180 विद्यार्थिनींना फक्त दोनच शिक्षक शिकवत आहेत शिक्षकांची अन्य पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण कोण शिकवणार हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा आहे . तक्रार केल्यामुळे मुख्याध्यापक दम देतात या भीतीपायी इथल्या मुलींना अश्रू अनावर झाले..

हे सुद्धा वाचा

अश्रूंना न्याय मिळणार की नाही?

ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या राहण्यापासून ते शिक्षणापर्यंतचा खर्च शासन करते. जेवण उत्कृष्ठ दर्जाचे मिळावे यासाठी कंत्राट देण्यात आले आहे. तिथे संपूर्ण निधी स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न स्थानिक प्रशासन आणि कंत्राटदार करतायत..

 

प्रशासक म्हणतात दखल घेणार…

या सगळ्या मागण्या घेऊन विद्यार्थिनींनी आज सहाय्यक आयुक्तांनाच घेराव घातला. आयुक्तांनीदेखील मुलींनी याआधीही निवेदन दिल्याचं कबूल केलं. आता माध्यमांसमोर मुलींनी अन्यायाला वाचा फोडल्यानंतर तरी ही शाळा राहण्यासाठी आणि शिकण्यासाठी सोयीची होईल, एवढीच अपेक्षा…