मुंबईः महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिनेशन (Budget Session) आजपासून सुरु होत आहे. मुंबईत पार पडणाऱ्या या अधिवेशनात विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरलं आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप नेत्यांनी नवाब मलिक हाय हाय… दाऊदच्या दलालांचा राजीनामा घ्या, अशी घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आशीष शेलार, अतुल भातखळकर आदी नेते उपस्थित होते. भाजप नेत्यांच्या या आंदोलनात काही वेळानंतर देवेंद्र फडणवीसदेखील (Devendra Fadanvis) सहभागी झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी यावेळी केली.
दाऊदच्या दलाल मंत्र्यांचा राजीनामा घ्या, अशा घोषणा विरोधकांनी यावेळी दिल्या. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदशी संबंधित व्यक्तींकडून जमीनी विकत घेण्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे. त्यामुळे हा सर्वात मोठा देशद्रोह असल्याची टीका भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. यावरून नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विधीमंडळाच्या अधिवेशनापूर्वीच भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकरित्या लावून धरली आहे. मात्र कालपर्यंत मलिक यांच्याकडून राजीनामा घेणार नाही, या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस तथा महाविकास आघाडी सरकार ठाम होती. आजच्या अधिवेशनात हा मुद्दा गाजणार असं दिसतंय.
इतर बातम्या-