मुंबई : संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हनुमान जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाने साजरा केला जातो. परंतु, कोरोना परिस्थिती विचारात घेत यावर्षी 27 एप्रिल 2021 रोजीचा हनुमान जयंती उत्सव नागरिकांनी साधेपणाने आपापल्या घरी साजरा करावा, असं आवाहन गृह विभागाने केलं आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत (Restrictions on Hanuman Birth Anniversary amid Corona in Maharashtra).
कोरोना स्थितीत सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या अतिसंसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता व वाढत्या कोविड रुग्णांच्या संख्येचा विचार करता महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या 13 एप्रिल 2021 च्या आदेशामधील मुद्दा क्र. 1,2,7 व 10 मध्ये नमूद तरतुदींच्या अधिन राहून या वर्षी हनुमान जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे, असे गृह विभागाने स्पष्ट केले.
गृहविभागाने केलेल्या सूचना काय?
कोरोनाच्या अनुषंगाने सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपापल्या घरी हनुमान जयंती उत्सव साजरा करावा. कोरोना प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. यावर्षी मंदिरात भजन, कीर्तन, पठण इत्यादींचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये.
भक्तांसाठी मंदीर व्यवस्थापनाला ऑनलाईन सुविधेचा पर्याय
मंदिरामधील व्यवस्थापक, विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक आदींद्वारे उपलब्ध करून द्यावी. हनुमान जयंती उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढू नयेत, असंही सरकारने स्पष्ट केलंय.
कोरोनाच्या अनुषंगाने शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा :
PHOTO : रामच नाही तर रावणासह रामायण आणि महाभारतातील ‘या’ पात्रांचाही भाजप प्रवेश
व्हिडीओ पाहा :