सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भागात सुमारे आठ ते दहा गावांवर मंगळवारी रात्री ड्रोन घिरट्या घालू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. चोरीच्या संशयामुळे सर्व गावांतील शेकडो तरुण आणि ग्रामस्थ रस्त्यांवर रात्रभर गस्त घालत होते.गावात चोरीच्या उद्देश्याने हे ड्रोन फिरत असल्याची अफवा पसरल्याने अनेकांची तर रात्रीची झोपच उडाली. गावातील तरुणांना रात्रीची गस्त सुरु केल्याने आणि मोबाईल व्हॉट्स ग्रुपवरुन चोरीच्या संदर्भातील विविध अफवांची यात भर पडल्याने गावातील लोकांत मोठी दहशत पसरली होती. मात्र या ड्रोनच्या उडण्यामागील खरे कारण आता समोर आले आहे. हे कारण ऐकूण आता गावकऱ्यांना आपल्या जमिनीची चिंता वाटू लागली आहे.
सांगलीतीर मिरज पूर्व भागातील टाकळी, बोलवाड, बेडग, आरग, मल्लेवाडी, एरंडोली, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी या गावात गेले काही दिवस रात्री सुमारे नऊच्या सुमारास ड्रोन अचानक घिरट्या घालू लागल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण पसरली आहे.त्यामुळे लहान मुले आणि महिलांमध्ये गोंधळ उडाला आहे. गावांमध्ये चोरीच्या उद्देशाने हे ड्रोन पाळत ठेवण्यासाठी घिरट्या घालत असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे शेकडो तरुण रस्त्यावर उतरून चोरांचा बंदोबस्त करण्याच्या उद्देश्याने पहारा देऊ लागले आहे. सर्व व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज फिरू लागले त्यामुळे थोड्याच अवधीमध्ये गावावर ड्रोन फिरत असल्याचे बातमी सर्वत्र पसरली. महिला आणि ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी या गावांना भेट देऊन घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे ध्वनीक्षेपकावरून आवाहन केले. त्यानंतरही या सर्व गावातील शेकडो ग्रामस्थ रात्रभर गस्त घालत जागेच राहिले होते. मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी ड्रोनची तपासणी सुरु असून ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये. जर कोणाला ड्रोन आढळला तर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले.
गेल्या काही दिवसापासून सांगली जिल्ह्यातील काही भागात रात्रीच्या उडणाऱ्या ड्रोनमुळे लोकांमध्ये मोठी दहशत पसरली होती.अनेक ठिकाणी चोरीचे प्रकार देखील घडल्याने ग्रामस्थ भयभीत होते. रात्रीचे ड्रोन उडवून चोऱ्या होत असल्याची अफवा पसरल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या काही दिवसापासून पोलिस याचा तपास करीत होते. ड्रोन उडवणारी टोळी शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.काल दुपारी खानापूर तालुक्यातील माहुली येथे काही व्यक्ती ड्रोन उडवताना तेथील लोकांच्या निदर्शनास आल्या. या गावकऱ्यांनी त्यांना पकडून विटा पोलिसांच्या ताब्यात दिले. ड्रोन संदर्भात तक्रार आल्यानंतर काल असाच ड्रोन उडत होता. ग्रामस्थांनी ड्रोन उडविणाऱ्या पकडून आमच्या स्वाधीन केले, परंतू भारत सर्वांगीण या कंपनीतर्फे रस्त्याचा सर्वेसाठी ड्रोन उडवले जात असल्याचा निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.