मुक्ताईनगरचा गड कोण राखणार? खडसे की पाटील? दावे, प्रतिदावे सुरु

| Updated on: Oct 12, 2023 | 3:09 PM

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरात राजकीय वारे वाहू लागले आहेत. राज्यात राजकीय बदल झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत येथील जनता कुणाच्या पारड्यात आपले दान टाकणार याची उत्सुकता आहे. खडसे आणि आमदार पाटील हे दोन्ही प्रबळ दावेदार आपणच जिंकणार असा दावा करत आहेत.

मुक्ताईनगरचा गड कोण राखणार? खडसे की पाटील? दावे, प्रतिदावे सुरु
MLA CHANDRAKANT PATIL, ROHINI KHADSE, EKNATH KHADSE
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

जळगाव : 10 ऑक्टोबर 2023 | जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हा विधानसभा मतदारसंघ गेली अनेक वर्ष भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या ताब्यात होता. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली. मात्र, त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली. तर, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांच्याविरोधात अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मतांवर चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत खडसे विरुद्ध पाटील असा सामना रंगणार का याची चर्चा सुरु झालीय.

एकनाथ खडसे यांनी भाजप विरोधात भूमिका घेत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली. दरम्यानच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फुट पडली. एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना शरद पवार गटाचे महिला प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आलं.

शिवसेनेमधून निवडून आलले आमदार चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. आमदार पाटील हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गोटात जाऊन सामील झाले. महाविकास आघाडीमुळे राजकीय समीकरणे बदलली होती. पण, शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फुट पडल्याने आता थेट सामना होणाची चिन्हे आहेत. त्यातच मुक्ताईनगर मतदारसंघ आगामी निवडणुकीबाबत वारे वाहू लागले आहेत.

हे सुद्धा वाचा

मुक्ताईनगर मतदार संघात आपल्याला उमेदवारी मिळणार असं वक्तव्य रोहिणी खडसे यांनी केले. राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटाच्या प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मुक्ताई नगर मतदारसंघात रोहिणी खडसे उमेदवार असतील अशी घोषणा केल्याचे त्यांनी सांगितलं. या तालुक्यातील आपण राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्यान त्यादृष्टीने गेल्या चार वर्षांपासून तयारीला लागलो असं त्यांनी म्हटलंय.

रोहिणी खडसे यांच्या या वक्तव्यावर त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी शिवसेना (शिंदे गट) आमदार चंद्रकांत पाटील यांनी जो समोर येईल त्याला आम्ही अंगावर घेणार असं सांगत खडसे यांना आव्हान दिलंय. प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी उमेदवारी जाहीर केली असेल. त्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही. मी प्रतिस्पर्धी आहे त्यामुळे समोर येईल त्याला अंगावर घेण्याची तयारी ठेवली आहे असे त्यांनी स्पष्ट केलं.

शिंदे सरकार हे जनतेसाठी अतिशय सकारात्मक आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघात शेतकऱ्यांची आणि जनतेची काम लवकरात लवकर होत आहेत. मागील निवडणुकीत आपण अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलो होतो. त्याला राष्ट्रवादीसह शिवसेनेने देखील पाठिंबा दिला होता. जनतेने साथ दिल्यानेच आपण निवडून आलो होतो असा टोलाही त्यांनी रोहिणी खडसे यांना लगावलाय.