…तर मी अजितदादांचं अभिनंदन करणार, रोहित पवारांनी पुन्हा डिवचलं

| Updated on: Nov 28, 2024 | 7:18 PM

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे, मात्र अजूनही नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा झालेली नाही, यावरून रोहित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

...तर मी अजितदादांचं अभिनंदन करणार, रोहित पवारांनी पुन्हा डिवचलं
Image Credit source: Facebook
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलं. तीनही घटक पक्ष मिळून फक्त पन्नास जागाच जिंकता आल्या. दुसरीकडे मात्र महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. महायुतीच्या राज्यात 230 जागा निवडून आल्या, 132 जागांसह भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या, राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्याचं पहायला मिळालं. राष्ट्रवादी अजित पवार गटानं 41 जागांवर विजय मिळवला. मात्र जरी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी देखील अजूनही नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये, यावरून आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल करताना अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा निर्णय दिल्लीत घेतला जातो.  पुर्ण बहूमत असताना यांना दिल्लीत 4-4 दिवस थांबावं लागतं. कालच्या प्रेसमध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचं एकदाही नाव घेतलं नाही . एकनाथ शिंदेंना केंद्रात घेतील, त्यांच्या चिरंजीवाला राज्यात उपमुख्यमंत्री करतील असं चित्र आहे. अजितदादांना मुख्यमंत्रिपद दिलं तर मी स्वत: जाऊन त्यांचं अभिनंदन करेल, एक पुतण्या म्हणून मी त्यांचं अभिनंदन करेल पक्ष म्हणून नाही असा खोचक टोला रोहित पवार यांनी अजित पवार यांना लगावला आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांकडून सातत्यानं ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. यावर देखील रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  अनेक मतदारसंघ आहेत, ज्यात मॅनुपिलेशन झालं असावं. भुजबळ साहेबांच्या मतदारसंघात काय झालं त्यांनी शहानीशा करावी. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढणवण्याऐवजी खच्चीकरण होत आहे. जे उमेदवार लढले, घरावर कर्ज काढून लढले त्यांच्यासाठी आम्ही लढतोय. शहानीशा होण्यासाठी नेत्यांनी पुढाकार घेतलाच पाहिजे. ईव्हीएम मशीनचं पोस्टमार्टम झालंच पाहिजे, आम्ही लढायला तयार आहोत, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.