मुंबई : राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू अगर मित्र नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. काल परवापर्यंत एकमेकांवर टीका करणारे आज मंत्रिमंडळात एकत्र बसणार आहेत. राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी मोठा भूकंप घडवून आणला आहे. भाजपा शिवसेनेसोबत सत्तेत भाग घेतला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेमकी कोणाची? त्यामुळे शिंदेंसारखं अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस हायजॅक करणार का? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी पुढे येत थेट इशारा दिला आहे.
रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतला एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यात पत्रकारांनी शरद पवार यांना पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? असा प्रश्न विचारला आहे. त्यावर शरद पवार असं उत्तर खुद्द शरद पवार यांनी दिलं आणि हसू लागल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवार यांनी लिहिलं आहे की, ‘बस नाम ही काफी हैं…’ त्याचबरोबर हॅशटॅग शरद पवार असं लिहिलं आहे.
#शरद_पवार
बस नाम ही काफी हैं… pic.twitter.com/6PVhCmpc7C— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 2, 2023
“वाट आहे संघर्षाची…म्हणून थांबणार कोण? सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा..दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा…मग संघर्षाला घाबरतंय कोण? लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच…” असं सांगत दुसरं ट्वीट केलं आहे.
वाट आहे संघर्षाची…
म्हणून थांबणार कोण?
सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा
दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा…
मग संघर्षाला घाबरतंय कोण?
लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच… pic.twitter.com/fORmLbW6tk— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 2, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. शपथविधी सोहळ्यामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. यावेळी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे व अनिल पाटील यांना देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.