कणकवलीः संध्याकाळी पाच वाजेची वेळ. गावाला जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांनी कशी बशी बसमध्ये जागा पटकावली. डेपोतून बस निघाली अन् काही वेळात इंजिनमधून (Engine) धूर येऊ लागला… बसला आग लागली… आग लागली… असा आवाज आला. चालकाने काही सांगण्याआधीच प्रवाशांनी मिळेल त्या खिडकीतून स्वतःला ढकलून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.. कणकवली (Kankawali) बस स्थानकात (Bus Stand) घडलेला हा प्रकार प्रवाशांना हादरवून सोडणारा ठरला.
कणकवली ते मालवणला जाणारी बस संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रवाशांनी भरली. कणकवली आगारातून असरोंडी, असगणी मार्गे ती मालवणला जाणार होती. सायंकाळी पाचच्या सुमारास कणकवली स्थानकातून निघाली होती. ही बस तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. त्यामुळे चालकाने बस थांबवली.
यात कुणीतरी प्रवाशाने एस.टी. बसला आग लागली अशी आरोळी ठोकली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी खिडकीतून,मिळेल तिथून बस बाहेर उड्या मारल्या. यावेळी तेथील नागरिकांनीही बसमधील प्रवासी तसेच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी यांना बस बाहेर काढण्यास मदत केली.
खिडक्यांतून, आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे हे दृश्य अक्षरशः अंगावर काटा येणारे आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
लोकांचा आवाज आणि धावपळ पाहून पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये चढून अजून कुणी तिथे उरलं नाही ना, याची कात्री केली.
बस सुरु होताच इंजिनमधून धूर येत होता, मात्र हा धूर ऑइलमुळे येत असल्याचे नंतर स्पष्ट झाले. प्रत्यक्षात कोणतीही मोठी आग लागली नव्हती. पण हा बिघाड गांभीर्याने घेत बसला आगारातच ठेवण्यात आले. घटनेनंतर प्रवाशांना अन्य गाडीतून पुढे पाठविण्यात आले.