पवारांवरील त्या वक्तव्यानंतर टीकेची झोड, सदाभाऊ खोत बॅकफूटवर; गावगाड्याची भाषा म्हणत..

| Updated on: Nov 07, 2024 | 11:17 AM

खोत यांच्या भाषणातील वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते , नेतेही आक्रमक झाले. त्या विधानावरून चहूबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊ खोत नरमले असून बॅकफूटवर जात त्यांनी माफी मागितली आहे.

पवारांवरील त्या वक्तव्यानंतर टीकेची झोड, सदाभाऊ खोत बॅकफूटवर; गावगाड्याची भाषा म्हणत..
सदाभाऊ खोत यांच्याकडून दिलगिरी व्यक्त
Follow us on

जतमध्ये महायुतीच्या सभेत भाषणादरम्यान सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. बोलता बोलता त्यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली. मात्र त्यांचे हे वक्तव्य अनेकांना झोंबलं असून महायुतीमध्येच सामील असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सदाभाऊंना फटकारलं. शरद पवार यांच्यावर केलेली वैयक्तिक टीका खपवून घेणार नाही, असं ट्विट अजित पवार यांनी केलं होतं. एवढंच नव्हे तर अजित पवारांन त्यांना फोन करून झापल्यांचीही माहिती समोर आली आहे. सदाभाऊ खोत यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याचंही अजित पवारांनी म्हटलं. खोत यांच्या भाषणातील वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते , नेतेही आक्रमक झाले आहेत.खोत यांनी शरद पवारांची माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही या टीकेचा निषेध केला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांनी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

कालच्या सभेतील विधानावरून चहूबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊ खोत नरमले असून बॅकफूटवर जात त्यांनी माफी मागितली आहे. एका व्हिडीओद्वारे खोत यांनी आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

ही गावगाड्याची भाषा..

जतमधील सभेत शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत केलेल्या टीकेबद्दल सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली, मात्र आपली भाषा ग्रामीण असल्याचं स्पष्टीकरणंही त्यांनी दिलं. ‘ माझा कुणाच्याही व्यंगत्वाकडे बघून बोलण्याचा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे, पण काही लोकांनी त्या शब्दाचा अर्थाचा विपर्यास केला. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी ते शब्द मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो. ‘ असे सदाभाऊ खोत म्हणाले.

काय होत सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य ?

जतमधील महायुतीच्या सभेत बोलताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप आमदार सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना पातळी सोडली. शरद पवार यांच्या आजारपणावरुन वक्तव्य करताना “आता महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?”, असा खोचक सवाल खोत यांनी विचारला. “महाराष्ट्र बदलायचा आहे म्हणजे तुम्हाला कसला चेहरा पाहिजे?” असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं.

त्यांच्या या टीकेनंतर ट्विट करत अजित पवार यांनी नाराजी नोंदवली होती. खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही असा इशारा अजित पवार यांनी दिला होता. तसेच त्यांनी खोत यांना फोनही केला. तुम्ही जे स्टेटमेंट केलं, ते आम्हाला कोणाला आवडलेलं नाही. कोणाविषयी व्यक्तीगत बोलणं ही आपली पद्धत नाही. त्याबद्दलचा निषेध केला , असं अजित पवारांनी आज माध्यमांशी बोलताना नमूद केलं.