राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. ऐन निवडणूक काळात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने स्वत : च्याच पक्षाबाबत केलेलं विधान आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. शिवसेना ही सुंदर स्त्री आहे. पण गळ्यात मंगळसूत्र नसल्यामुळे आज तिचे लचके तोडले जात आहेत, असं विधान शिंदे गटाचे नेते सदानंद चव्हाण यांनी केलं आहे. सदानंद चव्हाण हे माजी आमदार आहेत. शिवसेनेच्या माजी आमदाराने शिवसेनेची तुलना करताना वादग्रस्त विधान केलं आहे. लायसन्स आणि मंगळसूत्र नसल्यामुळे आता शिवसेनेला कोणीही शिट्या मारेल, असं सदानंद चव्हाण यांनी म्हटलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण- संगमेश्वर मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळाली नसल्यामुळे नाराज आहेत. माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्याकडून नाराजी व्यक्त करताना शिवसेनेचा मंगळसूत्र नसलेली सुंदर स्त्री म्हणून उल्लेख केला आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. सदानंद चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
रत्नागिरीतील चिपळूण संगमेश्वर मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच सुरु होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम इथून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. अजित पवार गटाकडून या जागेवर दावा सांगितला गेला. तर शिवसेना शिंदे गटाकडूनही या जागेसाठी प्रयत्न केले गेले. पण अखेर ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेली. शेखर निकम यांना अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार सदानंद चव्हाण हे देखील चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र शेखर निकम यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चव्हाण नाराज झाले. त्यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. या मतदारसंघात शिवसेनेची हक्काची मतं आहेत. तिथं आमचा उमेदवार निवडून येऊ शकत होता. पण ही जागा राष्ट्रवादीला गेली. त्यासाठी आम्ही नाराज आहोत. पण असं असेल तर महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांना आमचा पाठिंबा आहे. त्यांच्यासाठी झटून काम करणार आहे, असं सदानंद चव्हाण म्हणाले.