सोलापूर : पंढरपुरातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याण काळे यांनी गड राखला. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यावर पुन्हा एकदा कल्याणराव काळे गटाने वर्चस्व प्रस्थापित केलय. पण त्याचवेळी या निवडणुकीला गालबोट लावणारी एक घटना सुद्धा घडली आहे.
शासकीय गोदाम येथे वसंतराव काळे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याण काळे, भागिरथ भालके, गणेश पाटील आले असता कार्यकर्त्यांनी कल्याण काळे यांना खांद्यावर घेऊन गुलाल उधळून जल्लोष केला. मतमोजणीत सत्ताधारी कल्याणराव काळे गट आघाडीवर होता.
गाडीवर हल्ला
दरम्यान निवडणुकीतील विरोधक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजीत पाटील यांच्या गाडीवर हल्ला झाला. अभिजीत पाटील यांच्या गाडीच्या काचा फोडल्या.
कुठे घडली घटना?
सत्ताधारी कल्याणराव काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात गाडी फोडण्याचे कृत्य केल्याचा संशय आहे. मतमोजणी केंद्राबाहेर गाडी फोडण्याची घटना घडली. या घटनेमुळे सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीला गालबोट लागले.