शिर्डी : 2 ऑक्टोबर 2023 | देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले साई बाबा यांच्या भक्तांसाठी एक मोठी बातमी आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थान देशभरात साई मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेतलाय. या साई मंदिरासाठी भरीव आर्थिक मदत देण्याचाही प्रस्ताव साईबाबा संस्थानने मांडला आहे. एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे साई संस्थान शिर्डी सारखेच मंदिर उभारून ते चालविण्यात येणार आहे. या शिवाय तेथे रूग्णालय, अन्नदान आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. मात्र, या प्रस्तावाला ग्रामस्थांनी विरोध केलाय.
शिर्डीच्या साई संस्थानमध्ये सध्या उच्च न्यायालयाने नियुक्त केलेली तदर्थ समिती काम बघत आहे. या समितीमध्ये अहमदनगर जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा चार जणांचा समावेश आहे. या समितीनेच हा प्रस्ताव तयार केलाय.
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी देशभरात मंदिर उभारणीची आणि त्यासाठी आर्थिक मदत देण्याची नवीन पॉलिसी बनवण्याच्या विचारात समिती आहे असे सांगितले. तसेच, गावोगावी नव्याने उभारण्यात येणाऱ्या मंदिरांना पन्नास लाखांपर्यंत मदत करण्याचा संस्थान विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिर्डी संस्थानच्या समितीने शिर्डी ग्रामस्थ आणि भाविकांकडून अभिप्राय मागवले आहेत. मात्र, त्याआधीच समितीच्या या प्रस्तावाला शिर्डी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हा प्रस्ताव तातडीने मागे न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. लवकरच निषेध सभेचे आयोजनही करण्यात येणार आहे.
संस्थानाच्या समितीने घेतलेल्या या निर्णयाविरोधात शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शिर्डीत अनेक समस्या आहेत. शिर्डीचा विकास रखडलेला आहे असे असताना साई संस्थानचा पैसा बाहेर देऊ नये अशी भूमिका शिर्डी ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे साईबाबा संस्थान विरुद्ध शिर्डी ग्रामस्थ असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
समिती देशभरात मंदिर उभारणीची आणि त्यासाठी आर्थिक मदत देण्याची नवीन पॉलिसी बनवण्याच्या विचारात आहे. मात्र, शिर्डी सारखीच साई मंदिरे उभारल्यास शिर्डीचे महत्व कमी होईल अशी भीती ग्रामस्थांना वाटत आहे. तर, साईभक्तांनी साई संस्थानच्या या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.