छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा विभागात एक दोन कोटी नव्हे तर 21.59 कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. एका 13 हजार रुपये पगार असलेल्या कंत्राटी लिपिकाने हे कांड केल्याचे सांगितल्यावर तुमचा विश्वास बसेल का? पण इतके मोठे कांड होत असताना एकाही वरिष्ठाला काणकूण लागली नसल्याचा अंचबित करणारा दावा पुढे करण्यात येत आहे. एका लिपिकाने क्रीडा विभागाला कोट्यवधींचा चुना लावला आणि तो फरार झाला आहे. त्याने या पैशांतून जीवाची मुंबईच नाही तर अनेक भानगडी केल्याचे तपासात समोर आले आहे. आता मुख्य प्रश्न उरतो की वरिष्ठ अधिकारी कोणती पेंड खावून झोप घेत होते आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न हा पोरसवदा लिपिक अजूनही पोलिसांच्या हाती कसा लागत नाही?
सरकारच्या पैशावर नुसती ऐश
छत्रपती संभाजी नगर मध्ये क्रीडा विभागात झालेल्या 21.59 कोटीच्या घोटाळ्यातील पैशातून आरोपी हर्ष कुमार क्षीरसागर त्याने मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. ही मालमत्ता जप्त करून वसुली होऊ शकते मात्र त्याने खरेदी केलेले आणि पैसे अध्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही. क्रीडा खात्याच्या 21.59 कोटी रुपयावर डल्ला मारल्यानंतर हर्ष कुमारने शानशौक करण्यावर मोठी उधळपट्टी केल्याचं समोर आलं आहे.
हर्षकुमारला शोधण्यासाठी 8 पथकं
दरम्यान क्रीडा घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या हर्षकुमारला शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाने 8 पथके स्थापन केली आहे.आणि काल दिवसभर आरोपी यशोदा सह क्रीडा संकुलातील अधिकारी आणि कर्मचार्यांची चौकशी केली. तरीही तो अजून सापडला नाही. तो नेमका कोणत्या बिळात लपून बसला हे त्याला मदत करणारे अधिकारीच सांगू शकतील, अशी चर्चा क्रीडा प्रेमींमध्ये रंगली आहे.
पठ्ठ्याने असा उधळला पैसा
21 सप्टेंबर 2024 ला चतुर्थीच्या दिवशी 1.26 कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू कार खरेदी केली.
महिनाभरापूर्वी 22 लाख रुपये किंमतीची x-1000 RR ही दुचाकी खरेदी केली.
35 लाखांचा हिरेजडीत गॉगल हर्ष कुमारणे सराफा दुकानात दुरुस्तीसाठी दिल्याची माहिती आहे.
एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये भाड्याने राहत असलेल्या फ्लॅटसह शेजारील दोन फ्लॅट खरेदी.
हर्ष कुमार क्षीरसागर यांच्या अकाउंट वरून ब्रॅण्डेड कपडे,शूज आणि घड्याळासह इतर खरेदीसाठी विविध शॉपवर 70 हजार रुपयांचे ट्रांजेक्शन केल्याची माहिती समोर आली आहेत.