सागर सुरवसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 12 फेब्रुवारी 2024 : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे. त्यांच्या या राजीनाम्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांचा राजीनामा म्हणजे आमच्यासाठी धक्का आहे, असं अंबादास दानवे म्हणाले. तसंच त्यांनी भाजपवरही टीकास्त्र डागलंय. उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्यावरही अंबादास दानवे यांनी भाष्य केलं.
अशोक चव्हाण यांचा राजीनामा म्हणजे आमच्यासाठी धक्का आहे. भाजपाची ताकद क्षीण झालेली आहे म्हणून भाजप असं काम करत आहे. म्हणून त्यांना दुसऱ्या पक्षातील नेत्यांची गरज भासते आहे. अशोक चव्हाण ज्येष्ठ आणि मोठे नेते आहेत हे मानले पाहिजे. कोणतीही आघाडी किंवा पक्ष एका व्यक्तीवर चालत नसतो. कोणाच्या आल्याने आणि गेल्याने पक्ष संपत नसतो अशी अनेक उदाहरणं आहेत. भाजप ही 2 वरून 300 वरती गेली आणि काँग्रेस इंदिरा गांधींच्या काळात नेस्तनाभूत होऊन पुन्हा उभी राहिली आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावरही अंबादास दानवे यांनी भाष्य केलं. उद्धव ठाकरेसाहेबांचा आज जनसंवाद मेळावा आहे, मोठी जाहीर सभा नाही. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा मतदार संघात आज मेळावा आहे. शिवसेनेचे जुने जाणते कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. संभाजीनगर ही शिवसेनेची ताकद, शक्ती आणि ऊर्जा राहिलेली आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.
केवळ पंकजा मुंडे यांचाच मतदारसंघ राहिलेला नाही असे नाही तर अनेकांना मतदारसंघ राहिलेला नाही. केवळ पंकजा मुंडे यांच्यावरच नव्हे तर एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही अन्याय झाला. पंकजा मुंडे या भाजपच्या वरिष्ठ नेत्या आहेत. त्या पार्टी सोडून दुसरीकडे जातील असे नाही, असं असं म्हणत अंबादास दानवे यांनी पंकजा मुंडे यांच्या राजकीय वाटचालीवर प्रतिक्रिया दिली आहे.