दत्ता कानवटे, प्रतिनिधी-टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 07 नोव्हेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केलेत. मराठा तरूणांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातंय, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. त्यांनी ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. मराठ्यांच्या पोरांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. विनाकारण पोरांना अडकवलं जात आहे. पोरं आणि जात खचली पाहिजे असा डाव आहे. ओबीसी नेत्यांकडून हे होत आहे. जातीतील पोरं मोठी होऊ नये म्हणून ताकदीने प्रयत्न सुरू आहेत.सरकारने लक्ष द्यावं. सरकारने लक्ष दिले नाही तर मराठ्याच्या नेत्यांनी करावं. उद्रेक करणारे गुंतवू नका असं आमचं मत नाही. अर्थाचं अनर्थ करू नका, असं मनोज जरांगे म्हणालेत.
महाराष्ट्रातील जे मराठ्यांचे सर्व पक्षांचे नेते आहेत, त्यांना विनंती आहे, जाणूनबुजून षडयंत्र रचलं जात आहे. शांततेत आंदोलन करणाऱ्या पोरांना केसेसमध्ये अडकवलं जात आहे. त्यामुळे त्या मुलांकडे लक्ष ठेवा, कारण उद्या तुम्हाला याच मराठ्यांच्या पोरांची गरज पडणार आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही मदत केली नाही, तर महाराष्ट्रातील मराठ्यांची पोरं तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
सामान्य पोरांना अडकवू नका. पण सत्य आहे ते सत्य आहे. ओबीसी नेते मराठ्याच्या पोरांना अडकवण्याचा ओबीसी नेत्यांचा प्रयत्न आहे. हे षडयंत्र आहे. मराठा नेत्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला नाही तर पुढे तुम्हीही आमच्या हातात आहे. मग आम्हीच षडयंत्र हाणून पाडू, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक होत आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका मांडली आहे. त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. त्यांच्याबद्दल सांगणारही नाही. त्यांचा प्रश्न त्यांच्याकडे आहे. सामान्य मराठा आणि सामान्य ओबीसींचा प्रश्न आमच्याकडे आहे. आम्ही आमचं ठरवलं आहे. मी मराठा समाजाला आवाहन करतो. आपल्या गोरगरीबांचं कल्याण होणार आहे. फक्त एक दोन ओबीसींना ते पाहावत नाही. त्यामुळे मराठ्यांनी शांततेत आपली एकजूट वाढवा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.