दत्ता कानवटे, प्रतिनिधी-टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 07 नोव्हेंबर 2023 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी सुरु आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून या दोन नेत्यांमध्ये जुंपली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. भुजबळ यांना मराठा समाजाबद्दल एवढी जळजळ, आकस का?, असा सवाल मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांना विचारला आहे. छगन भुजबळ यांच्यामुळे राज्यात तणाव वाढत आहे, असा गंभीर आरोपही जरांगे पाटील यांनी केला आहे.
आमच्यासोबत चर्चेसाठी न्यायाधीशांना देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलं की, एकनाथ शिंदे यांनी हे मला माहीत नाही. पण पाठवणाऱ्यांनी आणि येणाऱ्यांनी योग्यच केलं. खुर्चीत बसून न्यायदान करणं आणि जनतेत जाऊन न्यायदान करणं चांगलंच आहे. न्यायाधीश जनता दरबार घेऊन शकतात. जनतेत येऊ शकतात. न्याय करणारे जनतेत गेले तर तुम्हाला काय वाईट वाटलं. एवढीपण जळजळ का व्हावी मराठा समाजांबद्दल. भुजबळांना एवढी जळजळ का व्हावी?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारलाय.
सामान्य ओबीसी लोकही म्हणतात ,भुजबळांनी सामान्य मराठ्यांचा एवढा राग करू नये. आम्ही भुजबळांच्या जातीचेच आहोत. त्यांनी एवढं करू नये. आम्ही सर्व एकाच ताटात खातो. भुजबळांनी एवढी जळजळ करू नये. भुजबळांमुळे तणाव वाढत आहे. भुजबळांना मराठ्यांबद्दल एवढा आकस का तेच कळत नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
नांदेडसह महाराष्ट्रातील एसपींवर दबाव आणला जात आहे. पोलिसांवर दबाव आणला जातोय. तुम्हाला काय करायचंय आमची सत्ता आहे. टाका सर्वांना आत असं पोलिसांना सांगितलं जात आहे. टाका सर्वांना आत म्हणजे? आम्ही शांततेत आंदोलन करणारे आहोत. आम्ही केसेसला घाबरत नाही. आता मराठ्यांनी ठरवलंय आपल्या पोरांचं कल्याण होणार आहे ना, असंही वाटोळं झालंय आणि तसंही झालंय. करू द्या त्यांना काय केसेस करायच्या त्या. आता आम्हीही हटणार नाही. आता आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे, असंही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
आपल्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून मराठा समाज ताकदीने रस्त्यावर उतरला आहे. पण आमच्या गोरगरिबांच्या पोरांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. हे योग्य नाही, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.