कन्नड, छत्रपती संभाजीनगर | 11 मार्च 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीची कारवाई सुरु आहे. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी या कारवाईवर स्पष्ट भाष्य केलं. माझ्या आई वडिलांनी शिकवलं आहे, की काही चुकीचं केलं नसेल तर कुणासमोर वाकायचं नाही. मग मी यांच्यासमोर का वाकू? माझ्या पत्नीला मी समजावण्याचा प्रयत्न करतो. पण तिच्या देखील मनात आहे की, मी एवढ्या मोठ्या नेत्यांविरोधात बोलतो. त्यामुळे मला जेलमध्ये टाकतील असं ती बोलते. पण मी तिला सांगितलं आहे की, आपण चुकीचं काही केलेलं नाही. त्यामुळे घाबरायचं नाही, असं रोहित पवार म्हणाले.
मी अडचणीचा ठरत असल्याने कारवाईला वेग आला आहे. आता जेलशिवाय कुठलीही कारवाई राहिलेली नाही. पण मी घाबरलेलो नाही. माझं कुटुंब तणावात आहे. मी त्यांना सांगतो की, महाराष्ट्र माझं कुटुंब आहे… याआधी अनेक नेत्यांना जेलमध्ये टाकलं आहे. काही लोक भूमिका बदलून पलीकडे गेले आहे. केजरीवाल यांच्या बाबतीत देखील तेच सुरू आहे. मी अडचणीचा ठरत असल्याने ईडी कारवाईला,आता जेलशिवाय कुठलीही कारवाई राहिलेली नाही, असं रोहित पवार म्हणाले.
बारामती ॲग्रो कारखान्याच्या द्वारावर लोडींग वाहनावर उभे राहून रोहित पवार उपस्थितांना संबोधित केलं. लोडिंग वाहनावर उभं राहून त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार घेऊन आपण सर्वजण कार्य करीत असतो. गेल्या काही महिन्यात माझ्या कारखान्यावर कारवाई केली गेली.कारवाई करणाऱ्यांना असे वाटले घाबरून जाऊ. जे कुणी घाबरणारे होते ते गेले. आम्ही लढणारे आहोत. घाबरणारे नाही!, असं म्हणत रोहित पवार यांनी आपला निर्धार बोलून दाखवला.
प्रेसनोट चुकीची आहे. जिथे काळा पैसा वापरला जातो तिथे तशी नोटीस दिली जाते.पीएमएलए ॲक्टमध्ये हा विषय येत नाहीत. जिथे गरज पडेल तिथे मी प्रचार करेल. माझी का आहे भीती वाटते ते त्यांना विचारा. मी सर्वसमांन्या माणसांचे मुद्दे मांडतोय, असंही रोहित पवार म्हणाले.