शिंदे गटात प्रवेश करणार?; अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद

| Updated on: Mar 16, 2024 | 2:03 PM

Ambadas Danve on Defection Rumors : ठाकरे गटाचे नेते, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी काही वेळा आधी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवरही दानवेंनी भाष्य केलं. वाचा...

शिंदे गटात प्रवेश करणार?; अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद
Follow us on

दत्ता कानवटे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 16 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशात आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून राजकीय नेते फिल्डिंग लावत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील छत्रपती संभाजीनगर म्हणून निवडणूक लढण्याची इच्छूक आहेत. अशातच जर तिकीट मिळालं नाही तर ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. अंबादास दानवे यांनी काही वेळाआधी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी या सगळ्या चर्चांवर भाष्य केलं.

अंबादास दानवे काय म्हणाले?

मी शिंदे गटात जाणार या कपोल कल्पित बातम्या आहेत. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मला उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. यासाठी हट्ट करणं, हा माझा अधिकार आहे. मात्र उध्दव ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य असेल.त्यांच्या आदेशाचं पालन करत आलेलो आहे. यापुढेही करत राहील. पक्षांतराच्या बातम्या या बदनामी करणाऱ्या आहेत. मी सामान्य शिवसैनिक आहे. एवढी मोठी जबाबदारी असताना नाराज होण्याचं कारण नाही. या बातम्या चुकीच्या आहेत, असं अंबादास दानवे म्हणालेत.

खासदारकीसाठी इच्छुक

खासदारकीसाठी १० वर्षांपासून मी इच्छुक आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील माहित आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी आणखी आमचा उमेदवार निश्चित नाही. आणखी नाव किंवा जुना चेहरा ठरलं नाही. मी शिंदे गटात जाण्यासाठी माझ्यात आणि दुसऱ्यात फरक आहे. माझ्याकडे खूप प्रॉपर्टी नाही की माझी चौकशी होईल. त्यामुळे मी तिकडे का जाईल?, असा सवाल दानवे यांनी विचारला आहे.

शिंदे गटात जाणार की नाही?

मी शिंदे गटात कधीच जाणार नाही. ही सेना पाच ते सहा महिन्यांची शिल्लक आहे. शिंदे आम्ही एकत्र होतो म्हणून माझ्या जाण्याची चर्चा असेल. शिंदे यांच्यासोबत माझे कामानिमित्त बोलणं होत असतं. शिवसेनाच यादी पक्षप्रमुख योग्य पद्धतीने जाहीर करत आहेत, असंही दानवे म्हणाले.

शिरसाटांच्या दाव्याला प्रत्युत्तर

बडा नेता शिवसेनेत येणार असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. यावर दानवेंनी प्रतिक्रिया दिली. आमची कोणतीही बैठक आज नाही. शिरसाट भूकंप होणार म्हणत असतील तर त्यांनाच विचारा… अंबादास दानवे भूकंप नाही… मी सामान्य माणूस आहे, असं दावनेंनी म्हटलं.