यंदाची लोकसभा निवडणूक प्रचंड चर्चेत आहे. या निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांनी आघाडी केली आहे. या आघाडीत देशभरातील विरोधी पक्ष आहेत. प्रकाश आंबेडकर यांची बहुजन विकास आघाडी इंडिया आघाडीत सामील होऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीशी चर्चाही करत होते. मात्र जागावाटपावर सकारात्मक चर्चा न झाल्याने प्रकाश आंबेडकर यांनी मविआत सामील न होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वंचितच्या उमेदवारांनी नावही जाहीर केली आहेत. मात्र आज महाविकास आघाडीतील नेते, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आवाहन केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आजही महविकास आघाडीत यावं. ते संवेदनशील नेते आहेत. भाजप देशात घटनेची पायमल्ली करत असताना सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे, असं दानवे म्हणाले.
एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले तेव्हा त्यांनी खूप आरोप केले. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं अजित पवार निधी देत नाहीत. विकास रोखतात, असं सांगितलं. आता अजितदादाच्या मांडीला मंडी लावून बसत आहेत. शिवसेना दिल्लीच्या दारात नेऊन ठेवली आहे, असं म्हणत अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
अभिनेते गोविंदा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोविंदा यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. राम नाईक आदरणीय आहे. त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिली ज्याने दाऊद यांचे पैसे घेऊन निवडणूक लढवली आहे. हे आम्ही नाही नाईक म्हणाले होते.गोविंदा यांचा जमाना गेला आता रणवीर सिंहचा जमाना आहे, असं अंबादास दानवे म्हणालेत.
अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांती त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. त्यामुळे या दोघांमधल्या नाराजी नाट्यावर पडदा पडलाय. नाराजीच्या चर्चांना या दोघांनी पूर्णविराम दिला. आमच्यात कुठलाही वाद नव्हता. यापुढेही आमच्यात वाद असणार नाही. आम्ही एक दिलाने काम करून विरोधकाला पराभूत करणार आहोत. या निवडणुकीत आमचा विजय शंभर टक्के होणार आहे, असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.