दत्ता कानवटे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 05 मार्च 2024 : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमित शाह विदर्भ आणि मराठवाड्यात जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. सुरुवातीला अकोला त्यानंतर जळगाव आणि संध्याकाळच्या सत्रात छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शाहांची जाहीर सभा होणार आहे. विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक देखील घेणार आहेत. त्यामुळे अमित शाह आज या सभांमध्ये काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. भाजप आणि महायुतीचे नेते या सभेला उपस्थित असणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे काल संध्याकाळपासूनच छत्रपती संभाजीनगर शहराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.अमित शाह यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर 186 अधिकारी आणि 1800 पोलिसांसह एस.आर.पी.एफ जवानांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या नेतृत्वाखाली 6 पोलीस उपयुक्त या सभेसाठी तैनात असतील. 11 सहायक आयुक्त, 41 पोलीस निरीक्षक, 128 उप निरीक्षक, 1277 पुरूष अंमलदार, 140 महीला अंमलदार, 1 SRPF जवानांनी तुकडी असा पोलीस बंदोबस्त तैनात असेल.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर अमित शाह यांची सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत. शिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री संदिपान भुमरे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे,पंकजा मुंडे उपस्थित असणार आहेत. शिवाय छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि जालना जिल्ह्यातील महायुतीचे प्रमुख नेते आणि आमदार या सभेला हजर असतील.