मराठवाडा हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण शिवसेनेची दोन शक्कलं झाल्यानंतरची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होत आहे. छत्रपती संभाजीनगगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संदिपान भुमरे एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी पण जोरदार मोर्चेबांधणी केली होती. आता अवघ्या काही तासात बालेकिल्ला कोणता गट राखणार हे स्पष्ट होईल.
यावेळी झाले 63.07 टक्के मतदान
मराठवाड्यातील सर्वाधिक चुरस अर्थातच छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसेल. औरंगाबाद मतदारसंघासाठी शिवसेनेतील दोन्ही गट, एमआयएम यांच्यात मोठी चुरस दिसत आहे. पहिल्या फेरीतील मतांच्या आकडेवारीतील चढउताराने समर्थक, नेते मंडळीत मोठी घालमेल होत आहे. या लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान झाले. या मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर मध्य, छत्रपती संभाजीनगर पूर्व, छत्रपती संभाजीनगर पश्चिम, कन्नड, वैजापूर आणि गंगापूर या 6 मतदार संघाांचा समावेश आहे.
27 फेऱ्यात मतमोजणी
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एमआयटी महाविद्यालयात सकाळी 8 वाजेपासून सुरु झाली आहे. मतमोजणीच्या एकूण 27 फेऱ्या होणार आहेत. दुपारी 3 वाजल्यानंतर विजयाचे चित्र सुस्पष्ट होईल. पण त्यापूर्वीच्या मत मोजणीच्या फेऱ्यांनी अनेकांची उत्सुकता ताणली आहे. तर काहींची चिंता वाढवली आहे. पहिल्या फेरीतच अनेकांच्या डोळ्यासमोर काजवे चमकले आहेत. औरंगाबादचा खासदार कोण होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचेच नाही तर राज्याचे लक्ष लागले आहे.
दुसऱ्या फेरीत इम्तियाज जलील यांची आघाडी
पहिल्या फेरीतील आकडेवारी समोर आलेली आहे. यामध्ये एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. 13748 मतांनी इम्तियाज जलील आघाडीवर आहेत. इम्तियाज जलील यांना 30200 मते मिळाली. तर दुसऱ्या फेरीत इम्तियाज जलील यांना 30560, संदीपान भुमरे यांना 20066 तर चंद्रकांत खैरे यांना 13883 मते मिळाली. इम्तियाज जलील 10494 मतांनी पुढे होते. येत्या फेऱ्यांमध्ये अजून चित्र स्पष्ट होईल. मराठवाड्याच्या राजधानीत एमआयएम सातत्य राखते की शिवसेना पुन्हा हा गड राखेल हे अवघ्या काही तासात स्पष्ट होईल.