दत्ता कानवटे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 28 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभा राहिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण करण्यात इशारा दिला आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे यांनी या आंदोलनावर भाष्य केलं आहे. मराठा आंदोलकांना त्यांनी आवाहन केलं आहे. जालन्यातील अंतरवली सराटी ते मुंबई अशी ही पदयात्रा असेल. विविध गावांमधून प्रवास करत मराठा आंदलोकांसह मनोज जरांगे मुंबईत दाखल होतील. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना आवाहन केलं आहे.
रोज वापरासाठी लागत असलेल्या वस्तू सोबत घेण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी आंदोलकांना केलं आहे. मुंबईत जाईपर्यंत जेवणाची व्यवस्था करावी लागणार नाही. मात्र तिथं गेल्यावर आपल्याला आपलं सामान बाहेर काढावं लागेल. शक्य असेल तर पाण्याचे टँकर, रुग्ण वाहिका सोबत घ्या. पीठ, सरपण, चुली, बादल्या, ताटं, तांब्या, कपडे चटई हे सगळं सोबत घ्या. रिक्षा, चारचाकी गाडीमधील मागील सिट काढून घ्या आणि झोपायची व्यवस्था करा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना आवाहन केलं आहे.
भजन करणाऱ्या मंडळींनी, टाळकरी मंडळी यांनी यावं ही विनंती आहे. गावगावांतील हलगी पथक, गावागावातील गणपती मंडळाचे ढोल घ्यावेत. पोवाडे म्हणणारे, शिवशाहीर किंवा शिकणारे शिवशाहीर असतील तर ना नफा न तोटा तत्त्वावर यावे मनोबल वाढविण्यासाठी यावं. जागरण गोंधळ करणारे, भरुडकार यांनी सोबत यावे, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय. जो हॉटेल चालक ना तोटा ना नफा या तत्त्वावर कुणी स्टॉल टाकत असेल तर चालेल. सरकारने फक्त आंघोळीची आणि प्रातविधीची सोय करावी, असं जरांगे म्हणालेत.
हरिभाऊ राठोड यांनी अर्ध वाचलंय. त्यांच्या आरक्षणामुळे आम्हाला अर्धा आरक्षण मिळत आहे. पूर्ण वाचल्यानंतर सांगू. पक्कं झाल्याशिवाय त्यांनी गडबड करू नये. त्यांच्या फोर्मुल्यावर सगळ्या मराठ्यांचा कल्याण होईल असं वाटत नाही, असंही जरांगेंनी म्हटलंय.