छत्रपती संभाजीनगर : कर्नाटकात सध्या निवडणुकीचं वारं वाहतंय. अशात राज्याचे मुख्यमंत्री तिथं प्रचारासाठी गेले आहेत. एकनाथ शिंदे आज बंगळुरूमध्ये आहेत. त्यावर ठाकरेगटाचे नेते, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर दानवे यांनी टीका केली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री मराठी बांधवांवर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीवर ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतात. संघटनेला बघून घेण्याची धमकी देत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीने एकत्रित उमेदवार दिलेले आहेत. मराठी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी लोक लढत आहेत. असं असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजपचा प्रचार करण्यासाठी कर्नाटक गेले आहेत, असं दानवे म्हणालेत.
मुख्यमंत्री कर्नाटकला प्रचाराला गेले ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. भारतीय जनता पक्षाच्या पालख्या वाहून मराठी बांधवांच्या विरोधात ते कर्नाटकात गेलेत.बारसूमध्ये नागरिकांवर लाठीचार्ज होतोय. खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला.त्याची अजून चौकशी झालेली नाही. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत या विषयासाठी वेळ देण्यापेक्षा कर्नाटकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा पालखी वाहण्यामध्ये मुख्यमंत्र्यांना जास्त इंटरेस्ट आहे, असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला आहे.
आज देशभरामध्ये भारतीय जनता पक्ष विरोधात सर्व पक्ष येत आहेत.कर्नाटकमध्ये सुद्धा जनता भाजपला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पक्षाची पराभवाची सुरुवात कर्नाटकमधून होणार आहे, असंही दानवे म्हणालेत.
सत्ता संघर्षाच्या निकालानंतर तरीही हे सरकार बहुमतात राहील, असं शरद पवार यांचं मत असेल. पण यामध्ये अनेक तांत्रिक बाजू आहेत. हा निकाल विरोधात गेल्यानंतर हे सरकार पडेल, असं अंबादास दानवे म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार यांनी आपला मेंदू बाजूला ठेवलाय. ते रिंग मास्टर जसा चाबूक फिरवतील तसे ते फिरत असतात. भाजपाच्या कोणत्याही नेत्याला स्वतःची बुद्धी वापरण्याचा अधिकार नाही. त्यांनी स्वाभिमानी बाण्याने काम करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याचा अधिकार नाही, असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला आहे.