मागण्या मान्य झाल्या तरी…; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला मनोज जरांगे ऐकणार?

| Updated on: Jul 07, 2024 | 5:52 PM

Prakash Ambedkar on Manoj Jarange Patil : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना एक सल्ला दिला आहे. विधानसभा निवडणुकीवर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. लाडकी बहीण योजनेवर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. आंबेडकर काय म्हणाले? वाचा सविस्तर...

मागण्या मान्य झाल्या तरी...; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला मनोज जरांगे ऐकणार?
Follow us on

जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर निवडणूक लढू, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. त्यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची पत्रकार परिषद झाली. तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या पूर्ण झाल्या तरी लढावं आणि नाही झाल्या तरीही लढावं…. मात्र 288 जागेवर त्यांनी गरीब मराठा उमेदवार द्यावेत. फक्त एसी आणि एसटी जागा सोडून त्यांनी लढावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला

माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे 31 खासदार निवडून आलेले आहेत. मराठा समाजाचे ते सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत. मनोज जरांगे पाटलांना जर मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल. तर त्यांनी एसी आणि एसटीच्या जागा सोडून इतर जागेवर गरीब मराठा उमेदवार द्यावेत, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

शिवसेना ठाकरे गट आणि वंचितने युती केली होती. यावरही आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिलीय. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमची युती झालेली होती. मात्र ती युती आता तुटलेली आहे. आता काहीही राहिलं नाही. त्यामुळे येणाऱ्या आठ दिवसांमध्ये आम्ही बैठक घेऊन या सगळ्या प्रश्नावरती उत्तर देऊ, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

लाडकी बहीण योजनेवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरही प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या काही दोन-चार कविता आल्या. त्या फार चांगल्या आल्या. तुम्ही दीड हजार रुपये महिना दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. पण या दीड हजारामध्ये आम्हाला गॅस स्वस्त मिळाले का? या दीड हजारामध्ये जी महागाई वाढलेली आहे ती पौष्टिक आहार खाऊ शकते का?, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक बैठक बोलवावी. ज्यामध्ये शरद पवार छगन भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांना बोलवावं. कुणी वाद लावत आहे लावत नाही हा विषय वेगळा परंतु जरंगे पाटलांचा जो विषय आहे की, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या हा जो प्रश्न उपस्थित केला त्याच्या संदर्भात त्यांनी बोलावं, असं आंबेडकरांनी म्हटलंय.