नामांतराचा निर्णय घेतला तेव्हा मी विधानसभेतील सदस्यांना बोलावून निर्णय घेतला. त्याची रिअॅक्शन इथे झाली. ती झाल्यानंतर त्याची किंमत काही गरीब लोकांना मोजावी लागले. तेव्हा माझ्या लक्षात माझी चूक आली. माझी चूक एक होती, ती म्हणजे मी मुंबईत बसून निर्णय घेतला. ज्यांची नाराजी होती, त्यांच्याशी संवादच साधला नव्हता. त्यानंतर मी स्वत: बाकीचा कार्यक्रम थांबवला. मी मराठवाड्यातील सर्व कॉलेजात गेलो आणि विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. त्यानंतर वर्ष दोन वर्षांनी लोकांनी आमच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे, असं शरद पवार म्हणालेत.
आरक्षणावर मतभेद नाही. काही गोष्टी अशा आहेत की मला काळजी दुसऱ्या गोष्टीची आहे. दोन वर्गात अंतर वाढतं की काय अशी स्थिती मला दिसते. मराठवाड्यातील दोन तीन जिल्ह्यात याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे असं वाटतं. मला काही सहकाऱ्यांनी सांगितलं की, अनेक ठिकाणी कुणाचं रेस्टॉरंट असेल अमूक समाजाच्या व्यक्तीचं असेल तर दुसऱ्या समाजाची व्यक्ती तिथे जात नाही. हे खरं असेल तर ते चिंताजनक आहे. ही स्थिती बदलली पाहिजे. त्यासाठी आमच्यासारख्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.
उद्या निवडणुका, संसदेचं अधिवेशन संपल्यावर आम्ही याबाबतचा संवाद साधण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागेल. आज मराठवाड्यात जो वाद निर्माण झाला आहे. त्या संदर्भात आम्ही नव्या पिढीशी संवाद साधणार आहोत. ते काम आम्ही करणार आहोत, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिजोरीत काही नाहीये. या सर्व घोषणा आहे. निवडणुकीच्यावेळी एखाद दुसरा हप्ता दिला जाईल.तो देऊन जनमानस आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न दिसतो. पण लोकांमध्ये ही चर्चा आहे की, हे निवडणुकीच्या पूर्वीच देतील. या पूर्वी यांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाही. अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्याचा काही ना काही तरी परिणाम होईल, असं शरद पवार म्हणाले.