अशोक चव्हाणांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा शाब्दिक हल्ला; म्हणाले, त्यांनी स्वत: चे…

| Updated on: Feb 13, 2024 | 10:42 AM

Sanjay Raut on Ashok Chavan will join BJP today : अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर महाविकास आघाडीतून नाराजी पाहायला मिळतेय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी स्वत:चे 12 वाजवून घेतलेत, असं राऊत म्हणालेत.

अशोक चव्हाणांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा शाब्दिक हल्ला; म्हणाले, त्यांनी स्वत: चे...
Follow us on

छत्रपती संभाजीनगर | 13 फेब्रुवारी 2024 : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांनी स्वत:चे 12 वाजवून घेतले आहेत, असं संजय राऊत म्हणालेत. आदर्श घोटाळा केलेले लोक तुमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. जनता तुमच्यावर थुंकत आहे, असं म्हणत राऊतांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय राऊत माध्यमांशी संवाद साधत होते. तेव्हा त्यांनी महायुतीवर निशाणा साधला.

अशोक चव्हाणांना टोला

मराठवाड्याचे भाग्यविधाते म्हणून घेणारे अशोकराव चव्हाण आज 12 वाजण्याच्या मुहूर्तावर स्वतःचे 12 वाजवून घेत आहेत. पंतप्रधान मोदी आता देशाला काय तोंड दाखवणार? खोटेपणाचा आणखी एक भाजपने रोवलाय का? शाहिदांचा अपमान केल्याचं पंतप्रधान नांदेडला येऊन सांगतात. मग आता त्यांना भाजपमध्ये घेऊन शाहिदांचा अपमान धुवून काढला का?, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.

अशोक चव्हाण हे दोन वर्षांपूर्वी पक्ष सोडणार होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच ते भाजपसोबत जाणार होते. गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष सोडण्यासाठी धडपडत होते. पण त्यांना आता मुहूर्त मिळाला, असंही संजय राऊत म्हणाले.

शिंदे- अजितदादा- चव्हाणांवर निशाणा

महाविकास आघाडी सोडून महायुतीत गेलेल्या नेत्यांवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही, एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना नाही, अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी नाही! यांच्या जाण्याने महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीच्या जागावाटपावर काहीही परिणाम होणार नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

संजय राऊतांचा मोठा दावा

काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा बदलली पाहिजे. काँग्रेस शुद्धीकरणचे महात्मा गांधींचे स्वप्न होतं. ते स्वप्न भाजपने स्वीकारलेलं दिसत आहे. काँग्रेसचे लोक सोबत घेऊन भाजप काँग्रेस सोबत युती करत आहेत. अशा पध्दतीनेच सुरू राहिलं तर आगामी निवडणुकीत भाजप 200 पार जाणार नाही, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.