उद्धवजींना सोडू नका…चंद्रकांत खैरे यांचा हात जोडत शिवसैनिकांना दंडवत; काय घडलं मेळाव्यात?

| Updated on: Jan 12, 2025 | 3:53 PM

Chandrakant Khaire : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील नाराजी नाट्य समोर आले. आता पक्षातून कोणी बाहेर पडू नये यासाठीचे आवाहन करण्यात येते आहे. चंद्रकांत खैरे हे छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना मेळाव्यात भावुक झाले.

उद्धवजींना सोडू नका...चंद्रकांत खैरे यांचा हात जोडत शिवसैनिकांना दंडवत; काय घडलं मेळाव्यात?
चंद्रकांत खैरे
Follow us on

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. गेल्या तीन दिवसात महाविकास आघाडीतील नाराजी नाट्य समोर आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा संजय राऊत यांनी नारा दिला. त्यानंतर आता चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडू नका अशी भावनिक हात देत शिवसैनिकांना हात जोडले. इतक्यावरच ते थांबले नाही, त्यांनी ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दंडवत घातला. पक्षाला सोडून न जाण्याचे आवाहन करत खैरे नतमस्तक झाले. या मेळाव्याची राज्यभर चर्चा होत आहे.

उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करा

शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिर येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकार्‍यांचा मेळावा झाला. त्याला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते. या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे खैरे म्हणाले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका आणि नगरपरिषदांची निवडणूक आहे. काही लोकांना वाटते की, आता पुढे काय..? मिधें गटाचे लोक त्यांना फसवत आहेत. तुमच्याकडे काय उरलंय असे ते म्हणतायेत. म्हणून मी मेळाव्यात एकनिष्ठ शिवसैनिकांना दंडवत घातला. त्यांना सोबत राहण्याचे आवाहन केले. उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.

हे सुद्धा वाचा

रामदास कदम जातीयवादी

रामदास कदम छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होते, त्यांनी काय घोळ केले आणि किती घोळ केले, हे सर्व मला माहित आहे. किती जातीयवाद केला हे ही मला माहित आहे..! जातीयवादाचा उगम महाराष्ट्रात रामदास कदम यांच्यापासून झाला आहे. म्हणून त्यांनी काही जास्त बोलू नाही, असे खैरे म्हणाले.

शिवसेना प्रमुखांनी त्यांना मंत्री केले होते, रामदास कदम जुने मित्र आहेत, त्यामुळे त्यांनी शांत राहिले पाहिजे. महायुतीने त्यांच्या मुलाला मंत्रीपद दिली आहे, ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे तुम्ही मोठे आणि मंत्री झालात, अशावेळी यांना तुम्ही विसरू नये, त्यांना उलटे बोलू नये, अशी माझी रामदास भाईंना मित्र म्हणून सल्ला आहे, असे ते म्हणाले.

धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा

मला काही कळत नाही सरपंचानाच, काय उडवत आहेत. सरपंचांना का मारत आहेत? असा प्रश्न खैरेंनी विचारला. मी बीडचा संपर्कप्रमुख असताना गुंडगिरीचा बिमोड व्हावा म्हणून प्रयत्न केले. मला धनंजय मुंडे यांचे वाईट वाटते, धनंजय मुंडे यांचे काय काय सुरू आहे, करुणा मुंडे काय काय बोलतात, फेसबुक मध्ये काय चाललंय, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्यांनी राजीनामा देऊन मोकळे झाले पाहिजे, तुम्ही स्वच्छ झाले की परत या, असे खैरे यांनी आवाहन केले.