भाजपने गेल्या निवडणुकीनंतर ज्येष्ठ नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात न उतरविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर अनेक राज्यातील निवडणुकीत आणि लोकसभेत त्याचा प्रत्यय आला. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने अनेक राज्यातील राज्यपालांची खांदेपालट केली. तर काही ठिकाणी ज्येष्ठांची वर्णी लावली. त्यात ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांना राजस्थानची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या फुलंब्री मतदारसंघात आता इच्छुकांमध्ये तिकीटासाठी काँटे की टक्कर दिसणार आहे.
फुलंब्रीचे दोन्ही दावेदार बाजूला
फुलंब्री मतदारसंघात भाजपकडून बागडे नाना आणि काँग्रेसकडून डॉ. कल्याण काळे असा दमदार सामना रंगला आहे. विधानसभा निवडणुकीत कल्याण काळे यांनी बागडे नाना कडवे आव्हान दिले. पण त्यांचा पराभव झाला. नुकत्याच झालेल्या जालना लोकसभा निवडणुकीत डॉ. कल्याण काळे हे जायंट किलर ठरले. त्यांनी या मतदारसंघात माजी खासदार रावसाहेब दानवे यांचा पराभव केला. काळे खासदार झाले. त्यांचा फुलंब्री विधानसभेवरचा दावा आपोआप संपला. तर आता बागडे नाना यांना पण राजस्थानच्या राज्यपाल पदाची जबाबदारी दिल्याने या दोघांचा या मतदारसंघावरील थेट दावा बाजूला पडला.
इच्छुकांचे आले उदंड पीक
फुलंब्री विधानसभा मतदार संघात आता मार्ग मोकळा झाल्याने, काँग्रेस, भाजप आणि इतर पक्षातील अनेक इच्छुकांचा आत्मविश्वास दुणावला आहे. भाजपमध्येच अनेक इच्छुक आहेत. अनेक जण गुडघ्याला बाशिंग लावून आहेत. तर काँग्रेससह इतर पक्ष पण तयारीत आहे. या मतदार संघात बंडखोरीचे पीक येण्याची पण भीती आहे. छत्रपती संभाजीनगरपासून अगदी हाकेच्या अंतरावर हा मतदारसंघ आहे. अनेकांनी फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही ठिकाणी त्यांची स्वतंत्र संपर्क कार्यालये पण थाटली आहेत.
कोण आहेत इच्छुक
भाजपकडून अनुराधा चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, विजय औताडे, राधाकिसन पठाडे, प्रदीप पाटील, काँग्रेसकडून विलास औताडे, जगन्नाथ कळे, विश्वास औताडे, संदीपराव बोरसे, तर शिंदे गटाकडून किशोर बलांडे, रमेश पवार, राजेंद्र ठोंबरे, शरद पवार गटाकडून राजेंद्र पाथ्रीकर, अजित पवार गटाचे नितीन देशमुख यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.