सलग तीनवेळा औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले संजय शिरसाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यंदा पश्चिम विधानसभेत मोठी चुरस दिसून येईल. या ठिकाणी उद्धव सेने शिरसाट यांना कडवी झुंज देण्याच्या तयारीत आहे. चौथ्यांदा आमदारकीचे शिरसाट यांचे स्वप्न भंग करण्याचा चंग उद्धव सेनेने बांधला आहे. शिंदे सेनेचे प्रवक्ते म्हणून शिरसाट यांनी जोरदार बॅटिंग केली. गेल्या दोन वर्षांत त्यांनी उद्धव सेनेवर घणाघात केले. आता निवडणुकीत पश्चिमचा घाट कुणाला जड जातो हे लवकरच समोर येईल. उमेदवारी अर्जासोबत शिरसाट यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत दहा पट वाढ झाली आहे.
किती आहे शिरसाट यांची संपत्ती?
अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रानुसार, गेल्या पाच वर्षांत त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेत दहापट वाढ झाल्याचे दिसून येते. पाच वर्षांच्या कालावधीत त्यांची संपत्ती 3 कोटी 31 लाखावरून तब्बल 33 कोटी 3लाखांवर गेली आहे. आज रोजी त्यांच्याकडे 44 लाख 78 हजार रोकड आहे, तर विविध बँकांचे त्यांच्याकडे 26 कोटी 45 लाख 75 हजार 922 रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद केले आहे. शिरसाट यांनी शुक्रवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे 4 कोटी 37 लाख 60 हजार 761 रुपये किमतीची शेतजमीन, तर 4 कोटी 70 लाख 45 हजार 860 रुपयांचे मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर शहरात फ्लॅट आहेत.
संपत्तीत अशी झाली वाढ
संजय शिरसाट यांच्या संपत्तीत गेल्या 5 वर्षात मोठी वाढ दिसली. 2019 मध्ये त्यांच्याकडे 1.21 कोटींची जंगम संपत्ती होती. 2024 मध्ये हा आकडा 13.37 कोटींवर पोहचला आहे. तर 2019 मध्ये स्थावर संपत्ती 1.24 कोटी रुपयांची होती. आता हा आकडा 2014 मध्ये 19.65 कोटी रुपयांवर पोहचला आहे. 2019 मध्ये त्यांच्याकडे जे सोने होते त्यात वाढ झाली. हा आकडा आता 1.42 कोटी इतका झाला आहे. 2019 मध्ये त्यांच्याकडे 5 लाखांची ठेव होती. 2024 मध्ये हा आकडा 81 लाखांवर पोहचला आहे.
उद्धव सेनेने पश्चिममध्ये संजय शिरसाट यांना आव्हान देण्यासाठी भाजप नेते राजू शिंदे यांना पक्षात घेतले. शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली. संजय शिरसाट यांनी गेल्या 15 वर्षांत या मतदारसंघाचा विकास केला नसल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. तर या मतदारसंघात जनता आपल्या पाठीशी असून आपलाच विजय होणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले आहे.