मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 16 सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले होते. लोकांच्या आग्रहाखातर दहा दिवसानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. आज छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात त्यांना डिस्टार्च मिळाला. नारायगडावरील दसरा मेळाव्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यापूर्वी त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या शिवाय आचारसंहिता लावू नये असा इशारा राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला दिला आहे.
तोपर्यंत आचारसंहिता लावू नये
मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या शिवाय आचारसंहिता लावू नये, अशी मोठी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. अर्थात त्यांनी अजून त्यांचे पत्ते उघडले नाहीत. लोकसभेचा दाखला देत त्यांनी राज्य सरकारला विधानसभेतील परिणामाचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. लोकसभेच्या वेळेस सांगितले होते आणि आताही सांगत, मराठ्याच्या मागण्या पूर्ण करा, असे ते म्हणाले. आरक्षण न देता निवडणुका लावल्यास सरकारला पश्चाताप होईल, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजच हेडमास्तर
तुम्ही कितीही वर्ग तयार करा, पण विधानसभेत हेडमास्तर मराठा समाजच असेल असे त्यांनी राज्य सरकारला बजावले. नारायण गडावरील दसरा मेळाव्याला राज्यभरातून मराठा समाजाने यावे, जे दुसरे मिळावे घेत आहेत त्यांच्या एसटी रिकाम्या जाऊ द्या. मराठा समाजाची इच्छा होती, की एक तरी मराठा समाजाचा दसरा मेळावा व्हावा आम्हाला राजकारण करायचे नाही, आमच्या मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करा, असे ते म्हणाले.
भाजपमधील मराठ्यांना दिला हा इशारा
निवडणुकीपूर्वी मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी आग्रही मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली. त्यांनी भाजपमधील मराठा नेत्यांना यावर विचार करून फडणवीस यांना याविषयीचा निर्णय घ्यायला लावावा. नाहीतर माझा नाईलाज आहे. फडणवीस यांना समजून सांगा. मराठ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय निवडणूक घेऊ नका, असा इशारा त्यांनी दिला. मराठ्यांना डावलू नका. मागण्या मान्य केल्या नाही तर सुपडा साफ होईल, असा इशारा त्यांनी भाजपला दिला.