महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election 2024) बिगुल वाजला आहे. पुढील नोव्हेंबरमध्ये नवीन सरकार अस्तित्वात आलेले असेल. मतदार राजा कुणाच्या ओंजळीत मताची बिदागी देतो हे समोर येईल. एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. बदलेल्या राजकारणामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात धाकधूक वाढली आहे. काही मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील 22 मतदारसंघात टफ फाईट दिसू शकते. नवीन चेहऱ्यांच्या मांदियाळीत दिग्गजांना फटका बसू शकतो. लोकसभेप्रमाणेच काही मतदारसंघात नवीन उमेदवार जायंट किलर ठरू शकतात. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) फुटीनंतर या मतदारसंघात चुरशीची लढत होईल. ठाकरे गट आणि शरद पवार गटाने या मतदारसंघासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. तर आता सुट्टी नाहीच म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुती, विशेषतः भाजपला थेट इशारा दिला आहे. मराठवाडा राज्याच्या राजकारणाची दिशा पालटण्याची शक्यता आहे.
22 जागांवर धुमश्चक्री
राज्यातील राजकारणाला 2019 पासून कलाटणी मिळाली. उद्धव ठाकरे यांनी अखंड शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत आणली. भाजपसोबत विधानसभा एकत्रित लढवणाऱ्या शिवसेनेने मुख्यमंत्री पद न दिल्याचा आणि विश्वास घात केल्याचा आरोप भाजपवर केला होता. त्यानंतर दोनच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला सुरूंग लावला. पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला मोठे भगदाड पाडले. तर दुसऱ्या प्रयत्नात अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली. महायुतीचे सरकारने अंतर्गत वादावर तोडगा साधत आतापर्यंत यशस्वी वाटचाल केली. आता या फुटीनंतर विधानसभेच्या रणांगणात मराठवाड्यातील 46 जागांमधील 22 जागांवर धुमश्चक्री पाहायला मिळणार आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत 2019 मध्ये शिवसेना 12 आणि भाजप 16 मतदारसंघात विजयी झाले होते. भाजपने गेल्या निवडणुकीत जागा वाटपात शिवसेनेवर कुरघोडी केली होती. मराठवाड्यातील 46 जागांपैकी तब्बल 26 जागांवर भाजप उमेदवार तर 20 जागांवर अखंड शिवसेना लढली होती. शिवसेना 12 जागांवर विजयी झाली होती. पक्ष फुटीनंतर 9 आमदारांनी शिंदे गटाची वाट धरली. अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, रमेश बोरनारे यांनी शिंदे गटाची पताका हाती घेतली तर हिंगोलीत संतोष बांगर, नांदेडमध्ये बालाजी कल्याणकर, धाराशीवमध्ये तानाजी सावंत, ज्ञानराज चौगुले यांचा यामध्ये समावेश आहे. तर उर्वरीत तीन जणच ठाकरे गटासोबत राहिले. आता गेल्या निवडणुकीतील आकडेवारीचा आधार घेतला तर काही मतदार संघात उद्धव ठाकरे गट जुने शिलेदार उतरवेल. तर इतर ठिकाणी नवीन उमेदवार देईल, हे स्पष्ट आहे.
2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागले होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोनच आमदार त्यांच्या बाजूने होते. राजेश टोपे आणि संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार यांची साथ कायम ठेवली. तर प्रकाश सोळंके, बाळासाहेब आसबे, धनंजय मुंडे, राजू नवघरे, बाळासाहेब पाटील, संजय बनसोडे यांनी अजितदादांचा गट जवळ केला. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाला नवीन चेहऱ्यांना उमेदवारी द्यावी लागणार आहे. इच्छुक गुडघ्याला बाशिंग लावून तयार आहेत.
मराठवाडा हा तसा चळवळींचा केंद्रबिंदु, आंदोलनाची भूमी. येथील अनेक चळवळी, आंदोलनांनी देशाला मोठा विचार दिला आहे. मराठवाड्यातील संत चळवळीने देशभरात समता, बंधुता आणि एकतेची घुसळण केली. येथील संतांनी, पंडितांनी देशभरात मोठा विचार प्रसवला. औद्योगिकीकरणाची नवीन मुहूर्तमेढ रोवली. दुष्काळाशी दोन हात करून अनेकांचं आयुष्य जगवलंच नाही तर फुलवलं. नामांतराच्या चळवळीने नवीन विचार दिला. हा लढा देशात ऐतिहासिक ठरला. तर गेल्या दहा वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा सिंचनाचे काम मराठवाड्याने केले आहे. या ज्वलंत विषयावर मराठवाड्याने राज्यालाच नाही तर देशातील आरक्षण चळवळीला नवा मंत्र आणि तंत्र दिले. आरक्षणासाठी आजवर हिंसक आंदोलनं झाली. मराठा समाजाचे विराट मोर्चे निघाले. त्यात स्वयं शिस्त दिसली. अहिंसक मार्गाने लाखो लोक रस्त्यावर उतरण्याचे हे उदाहरण विरळ म्हणावं लागेल. आता मराठा फॅक्टरची चर्चा रंगली आहे. लोकसभेत मराठा फॅक्टरने (Maratha Factor) त्याची ताकद दाखवली. महायुतीला केवळ एकच जागा खिशात घालता आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिलेदार छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आला. ओबीसी मतांची खेळी खेळण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट आला. मराठा फोर्स त्यांच्यापासून दूर गेल्याचे चित्र आहे. आता विधानसभेत पुन्हा एकदा मराठा फॅक्टर भाजपला त्रासदायक ठरणार की ओबीसी समीकरणं तारून नेणार हे समोर येईल. पण मराठवाड्यात भाजपला फटका बसला तर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलेल हे नक्की. त्यातच आता एकनाथ शिंदे यांना मराठवाड्यात त्यांचे गणित साधता येऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनोज जरांगे पाटील यांनी वादग्रस्त विधानं केलेली नाहीत. उलट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी टार्गेट केलेले दिसते.
मराठवाड्यात मराठा फॅक्टर किती प्रभावी?
मराठवाड्यातील 46 मतदारसंघांपैकी 26 मतदारसंघात मराठा समाज उलटफेर करू शकतो. या भागात मराठा मतपेढी परिणामकारक आहे. तर इतर मतदारसंघात ओबीसी मतं महत्त्वाची आहे. पण या ठिकाणी मराठा, मुस्लीम आणि दलित मते एकत्र आल्यास भाजपची वाट बिकट आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांनी थेट भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप केले आहेत. त्यांनी त्यांचा रोख स्पष्ट केला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयीचा सॉफ्ट कॉर्नर अनेकदा दिसून आला आहे. जरांगे यांच्यावर महाविकास आघाडीसोबत छुप्या युतीचा आरोप करत फडणवीस यांनी ओबीसी आणि भाजपचा डीएनए एकच असल्याचा दावा केला होता. गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज भाजपवर नाराज असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यातील मराठा आंदोलनाची धग राज्यभर पोहचली आहे. मराठवाड्यात त्याचे अधिक चटके महायुतीला बसण्याची भीती आहे. लोकसभेतील निकालाने भाजपाला थेट संदेश दिला आहे. भाजपाला या भागात अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी उमेदवार उभे करण्यास आणि काहींना पाठिंबा देण्याचे धोरण आखले आहे. या मतविभाजनाचा कुणाला फायदा होतो, हे निकालानंतर समोर येईल. पण धास्तावलेल्या अनेक नेत्यांनी जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे रात्री भेटीचा सपाटा लावला आहे. त्यावरून बऱ्याच मतदारसंघात समीकरणं बदलण्याचे संकेत मिळत आहेत.
दसरा मेळावा बांधणार कुणाचे तोरण?
दसऱ्याला मराठवाड्यात भगवानगडावर मोठा मेळावा भरतो. सालाबादप्रमाणे यंदा पण हा मेळावा झाला. पण यंदा या मेळाव्याला मराठा आरक्षण आणि ओबीसी आंदोलनाची किनार होती. सध्या या दोन्ही मुद्दावरून मोठं ध्रुवीकरण सुरू आहे. तर जवळच नारायण गडावर पहिल्यांदा मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा झाला. त्यात मराठा आरक्षणाचा हुंकार भरण्यात आला. तर भगवानगडावर ओबीसींच्या हिताची गोष्ट करण्यात आली. या दोन्ही मेळाव्याला लाखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. विधानसभेच्या तोंडावर या मेळाव्यांनी वातावरण निर्मिती केली आहे. मराठवाड्यातील 46 मतदारसंघापैकी अनेक मतदारसंघात मेळाव्याचा परिणाम दिसेल. कुणाच्या भाळी विजयाचे तोरण हे मेळावे बांधतात हे समोर येईल.
साधारणतः 20 वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत, 2004 मध्ये मराठवाड्यात विधानसभेच्या 46 जागांपैकी 7 जागा काँग्रसेकडे होत्या. तर 10 जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला होता. शिवसेनेने 14 जागांवर तर भाजपने 12 जागा राखल्या होत्या. पुढे 2009 मधील विधानसभा निवडणुकीत 46 जागांपैकी काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आणि 18 जागा जिंकल्या. राष्ट्रवादीला 12 जागा राखता आल्या. शिवसेना 7 जागा तर भाजपला अवघ्या 2 जागांवर विजय मिळवता आला होता. 2014 मध्ये मोठी उलथापालथ झाली. मोदी लाटेचा परिणाम मराठवाड्यातही दिसून आला. काँग्रेस निम्म्यावर म्हणजे 9 जागेवर विजयी झाली तर राष्ट्रवादीने 8 जागा राखल्या. शिवसेना 11 तर भाजप सर्वाधिक 15 जागांवर विजयी झाली. 2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फटका बसला. दोघांच्या प्रत्येकी 8 जागांवर उमेदवार विजयी झाले. तर शिवसेनेने मराठवाड्यातून 12 जागांवर तर भाजपने 16 जागांवर विजय नोंदवला.
एकनाथ शिंदे यांना होणार फायदा?
भाजपने अनेकदा मराठा आंदोलनामागे महाविकास आघाडी विशेषतः शरद पवार हे असल्याचा आरोप केला आहे. हे आंदोलन महाविकास आघाडीने हायजॅक केल्याचा आरोप करण्यात आला. पण या आंदोलनाचा भाजपलाच अधिक फटका बसल्याचे दिसून येत आहे. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात थेट मोर्चा उघडलेला नाही. त्यांचा रोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर असल्याचे अनेक भाषणातून दिसून येते. मराठा आंदोलनाला काऊंटर करण्यासाठी ओबीसी आंदोलन सुरू झाले. त्याला देवेंद्र फडणवीस यांचं पाठबळ असल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला. ओबीसी आंदोलनातील काही नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी रसद पुरवल्याचा थेट आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ओबीसी आणि आमचा डीएनए एकच असल्याचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ओबीसी मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात तीव्र भाषा वापरलेली नाही. अनेकदा शिंदे यांनी मराठा आंदोलनाच्या पूरक भूमिका घेतल्याचे दिसून येते. ते वाशी येथे थेट जरांगे पाटील यांना भेटायला गेले होते. सगे-सोयरेबाबत त्यांनी पूरक भूमिका घेतली. यामुळे लोकसभा निवडणुकीत संदीपान भुमरे विजयी झाले. मराठवाड्याच्या मैदानात त्यामुळे महाविकास आघाडीसोबतच शिंदे सेनेला पण मोठी संधी असल्याची चर्चा सुरू आहे. काही मतदारसंघात थोडाफार फरक दिसू शकतो. पण भाजपला मराठवाड्याच्या मैदानात मोठी कसरत करावी लागणार हे नक्की. अजितदादा गटाने मराठा आरक्षणाला इतर कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता पाठिंबा दिला आहे. पण छगन भुजबळ यांनी ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याच्या मागणीला कडाडून विरोध केल्याचे दिसून आले. त्यांनी मराठवाड्यात येत त्यासाठी खास ओबीसी सभा घेतल्या. त्यांच्यावर मराठा समाज नाराज झाला आहे. या नाराजीचा फटका अजितदादांना लोकसभेत सहन करावा लागला. आता विधानसभेत भुजबळ यांच्या भूमिकेचे काय पडसाद उमटतात हे एका महिन्यात समोर येईल.
लोकसभेत महायुतीची एकच जागा
1.नांदेड लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रतापराव चिखलीकर यांचा 59 हजार 442 मतांनी पराभूत झाले.
2.उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे अर्चना पाटील यांचा 3 लाख 29 हजार 846 मतांनी पराभव झाला.
3.बीड लोकसभा निवडणुकीत मोठा फेरबदल झाला. अटीतटीच्या लढतीत भाजपच्या पंकजा मुंडे यांचा 6 हजार 553 मतांनी पराभव झाला.
4.लातूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुधाकर श्रृंगारे यांचा 61 हजार 881 मतांनी पराभव झाला.
5.औरंगाबाद लोकसभेत तिरंगी लढत होती. उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यासोबत पहिल्यांदच शिवसेनेचे संदीपान भुमरे मैदानात उतरले होते. पण मराठा फॅक्टरमुळे भुमरेंचा 1 लाख 33 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले.
6.जालना लोकसभेत धक्कादायक निकाल लागला. भाजपचे रावसाहेब दानवे यांचा 1लाख 9 हजार 958 मतांनी पराभव झाला. मराठा फॅक्टरने गणित बदलले आणि काँग्रेसचे कल्याण काळे विजयी झाले.
7.परभणी लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी झालेल्या बदलाचे मोठा परिणाम रासपचे महादेव जानकर यांना बसला. त्यांचा 1 लाख 34 हजार 61 मतांनी पराभव झाला. संजय जाधव यांनी हा गड राखला.
8.हिंगोली लोकसभेत शिवसेनेचे बाबूराव कदम कोहळीकर यांचा 1 लाख 8 हजार 602 मतांनी पराभव झाला. हिंगोलीने परिवर्तन पॅटर्न ठेवला आणि उद्धव ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी मुसंडी मारत विजय मिळवला.