‘देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन धर्मांबाबत चिंता वाटावी अशी परिस्थिती’, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jun 06, 2023 | 10:32 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मांबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी आज आपल्या भाषणात देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला.

देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन धर्मांबाबत चिंता वाटावी अशी परिस्थिती, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य
Follow us on

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज भाजप सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी विविध मुद्द्यांवरुन आज भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी नांदेडमध्ये घडलेल्या दंगलीवरही प्रतिक्रिया दिली. तसेच औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींवरही प्रतिक्रिया दिली. याशिवाय त्यांनी नव्या संसद भवनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरुनही मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी शरद पवार यांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय नागरिकांबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं.

“देशात सध्या मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन धर्मांबाबत चिंता वाटावी, अशी परिस्थिती आहे. व्यक्तिगत कारणातून समाज आणि चर्चवर हल्ला करणे चूक आहे. मुस्लिम समाजात चार-दोन चुका होऊ शकतात, तशा गोष्टी हिंदूंकडूनही होऊ शकतात, असं शरद पवार म्हणाले.

“समाज एकसंध करायचा असेल तर एखादा घटक मागास ठेऊन होऊ शकत नाही. पण काही लोक जाणीवपूर्वक भेदभाव करत आहेत. हे मोठं आव्हान देशासमोर मला दिसत आहेत. लोकांनी एकजुटीने द्वेषाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. देश आणि समाज एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

हे सुद्धा वाचा

‘मी नामांतराचा निर्णय घेतला आणि…’

“मी नामांतराचा निर्णय घेतला आणि औरंगाबादला दंगा झाला. तेव्हा आम्ही इथे आलो, समजावून सांगितले. निर्णय तहकूब केला. नंतर मराठवाड्यात फिरून संवाद साधला आणि नंतर पुन्हा निर्णय घेतला. मान्य झाला. पण हा निर्णय आधी का मान्य झाला नाही? तर आम्ही संवाद साधला नव्हता”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

‘नांदेडला दंगल झाली, मी माहिती घेतली तेव्हा…’

“नांदेडला दंगल झाली. मी माहिती घेतली तेव्हा यात आपले लोक नव्हते, असे मला सांगितले. तेव्हा मी विचारले आपले म्हणजे कोण? शासकीय यंत्रणा सुद्धा जातीय भूमिका घेतात तेव्हा चुकीच्या गोष्टी घडतात. त्यामुळे राजकारण्यांनी आपला आणि परका अशी भूमिका ठेवू नये”, असं मत शरद पवार यांनी मांडलं.

‘शिवाजी महाराजांचे राज्य भोसल्यांचं राज्य म्हणून ओळखले गेले नाही’

“हे राज्य रयतेचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी आपल्या धोरणातून आणि कृतीतून दाखवून दिलं. शिवाजी महाराजांचे राज्य भोसल्यांचं राज्य म्हणून ओळखले गेले नाही. तर हे राज्य रयतेचे राज्य म्हणून ओळखले गेले. मी अनेक प्रवास केले तिथे गेल्यावर विचारलं तर तेही शिवाजी महाराजांचे नाव घेतात”, असं शरद पवार म्हणाले.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलसंपदा आणि ऊर्जामंत्री होते. त्यावेळी त्यांनी काही महत्त्वाची धरणे बांधले. त्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे भाकरा नांगल प्रकल्प हे होते आणि इथे वीज निर्माण करून दारिद्र्य निर्मूलनाचे प्रयत्न केले गेले. त्यांनी पावर कॉर्पोरेशन तयार केले. असे निर्णय त्यांनी घेतले. सामाजिक असेट त्यांनी निर्माण केले”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

‘देशात संवाद राहिला नाही’

“देशात सध्या संवाद कमी झाला आहे. सभागृहात जाऊन मला 56 वर्ष पूर्ण होत आहेत. पण मी असं कधीही पाहिलं नाही की सभागृहात बोलणारे लोक अन्य देशातले आहेत, असं पाहिलं जातं आहे. सुसंवाद आज राहिला नाही”, असा दावा शरद पवारांनी केला.

“चंद्रशेखर देशाचे पंतप्रधान होते तेव्हा बाबरी मस्जिद मुद्दा आला. त्यावेळी त्यांनी मला आणि भैरवसिंह शेखावत यांना बोलावले आणि मला हिंदुत्ववादी संघटनांशी बोलण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यावेळी सर्व अल्पसंख्याक लोकांनी वादाशिवाय प्रश्न सोडवायला मंजुरी दिली. हिंदुत्ववादी संघटना तयार होत असताना चंद्रशेखर यांचं सरकार गेलं आणि प्रश्न तसाच राहिला. आज संवाद राहिला नाही”, असं शरद पवार म्हणाले.

“सभागृहात पंतप्रधान जर हजर राहिले तर आम्हाला आनंद वाटतं. कारण देशाच्या प्रमुखाचे दर्शन झाले आज काहीतरी वेगळा दिवस वाटतो”, असंही ते यावेळी म्हणाले.

‘देशाला नव्या संसद भवनची गरज काय?’

“देशाला नव्या संसद वास्तूची गरज काय होती? हाच मला प्रश्न पडतो. पण निर्णय झाला. संवाद नव्हता, त्यामुळे निर्णय घेतला. नवीन संसद बांधण्याचा निर्णय आम्हाला माहीत नव्हता. कुठलाही संवाद न करता हा निर्णय घेतला”, असा आरोप शरद पवारांनी केला.

“देशाच्या राष्ट्रपतीला निमंत्रण देण्याची मागणी केली. पण सहभागी केलं नाही. त्यामुळे आम्हीही त्या उद्घाटनाला गेलो नाही. देशाच्या पहिल्या संसदेचा फोटो माझ्याकडे आहे. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरु आणि इतर मान्यवर होते आणि आता उद्घाटन झालं तर फोटोत सगळे साधू होते”, असं शरद पवार म्हणाले.

‘उपराष्ट्रपतींना निमंत्रण नव्हतं, कारण…’

“उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे प्रमुख असतात. पण त्यांनाही निमंत्रण नव्हतं. त्यांना निमंत्रण का नव्हते? तर प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपतीला निमंत्रण द्यावं लागतं असतं आणि प्रोटोकॉल नुसार नरेंद्र मोदी तिसऱ्या क्रमांकावर गेले असते. त्यामुळे निमंत्रण त्यांनाही दिलं नाही”, असा टोला शरद पवारांनी लगावला.

‘…तर लोक दुसरा सुद्धा पर्याय निवडू शकतात’

“माझा देशातील सामान्य माणसांवर विश्वास आहे. देशातील सामान्य माणूस शहाणा आहे. राजकारणी चुकीच्या मार्गावर गेला तर तो आम्हाला योग्य मार्गावर आणतो. 1977 साली संसदीय लोकशाहीला धोका झाला. त्यांनाही लोकांनी पराभूत केलं. पुन्हा जनता सरकार आले. त्यांच्या काही चुका झाल्या तेव्हा त्यांनाही खाली खेचलं. पुन्हा इंदिरा गांधी आणल्या”, असं पवार म्हणाले.

“केरळ, कर्नाटकात भाजप सरकार नाही. कर्नाटकात भाजपने जे केलं ते यापूर्वी आम्ही कुठेही पाहिलं नव्हतं. तरीही भाजपला सत्ता मिळाली नाही. कारण हा निकाल लोकांनी लावला. गोव्यात सुद्धा लोकांनी सत्ता हातात घेतली. तेलंगणा, आंध्रमध्ये सरकार नाही. महाराष्ट्र, गुजरात वगळले, पण मध्य प्रदेशमध्ये सरकार नव्हते. पण आमदार फोडून सरकार आणले. इतर अनेक राज्य भाजपकडे नाहीत. आसाममध्ये परिस्थिती अधिक गंभीर आहे. एका समाजावर अन्याय वाढले आहेत”, असंही ते म्हणाले.

“संस्थांची प्रतिष्ठा आपण ठेवली नाही तर सामान्य माणसाला सुद्धा त्याची प्रतिष्ठा वाटणार नाही. देशातील सर्व संस्था संकटात आहेत. संस्थांना धोका करणारे राजकारणी आम्हाला नको आहेत, असा निर्णय लोकांनी घेतला आहे. विरोधी पक्ष चांगला पर्याय लोकांना देऊ शकले नाहीत आणि सावध झाले नाहीत तर लोक दुसरा सुद्धा पर्याय निवडू शकतात”, असा इशारा शरद पवारांनी दिला.