मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका यापूर्वी जाहीर केल्यानंतर राज्यात वातावरण तापले. मराठा संघटनांनी त्यांच्या या भूमिकेवर नाराजी जाहीर केली. ते मराठवाडा दौऱ्यावर आहेत. अखरेच्या टप्प्यात त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पक्ष स्थापनेपासून मनसेची आरक्षणावर एकच भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठवाड्याच्या राजकारणाची प्रचिती आली
सोलापूरपासून दौऱ्याला सुरुवात केली. साडेतीन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका आहेत. दिवाळीनंतर होतील असं चिन्ह आहे. असं आज तरी वाटतंय. त्यादृष्टीने माझा मराठवाड्यातील पहिला दौरा आज संभाजीनगरात पूर्ण होतोय. २० तारखेला माझा विदर्भ दौरा सुरू होतोय. मी दौरा आवरता घेतला अशा बातम्या तुमच्याकडे आल्या. कुठला आवरता घेतला माहीत नाही. पण माझा दौरा पूर्ण झाला. मधल्या काही गॅप होत्या. हिंगोलीला राहणार होतो. पण तिथून मी परभणीत आलो. सोलापूरपासून सुरुवात झाली. गेल्या अनेक दिवसापासून मराठवाड्यातील राजकारण आणि वातावरण पाहत होतो, ऐकत होतो. त्याची प्रचिती आली.
जाणीवपूर्वक बातम्या आल्या
सोलापूरच्या पत्रकार परिषदेत मी बोललो ते सर्वांनी पाहिलं ऐकलं. पण त्यानंतर जाणीवपूर्वक बातम्या केल्या. त्या धक्कादायक होत्या. राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध, राज ठकारे विरुद्ध मराठा समाज. वाट्टेल त्या हेडलाईन केल्या, असे राज ठाकरे म्हणाले. त्यांनी त्यांची नाराजी जाहीर केली. या बातम्या जाणीवपूर्वक दिल्याचा आरोप पण त्यांनी केला.
पक्ष स्थापनेपासून एकच भूमिका
तुम्हाला आठवत असेल तर २००६ रोजी पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आमची एकच भूमिका राहिली आहे, ती म्हणजे आरक्षण द्यायचंच असेल तर आर्थिक निकषावर द्या, असे त्यांनी स्पष्ट केले. आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. त्या उपर राज्याला आरक्षणाची गरज नाही. कारण या राज्यात शिक्षणापासून, उद्योग आणि इतर गोष्टी उपलब्ध आहेत. नोकऱ्या आहेत. बाहेरच्या राज्यातील लोकांना या गोष्टी मिळतात. ते येऊन घेतता. त्याच गोष्टी आपल्या लोकांना दिल्या तर आरक्षणाची गरज उरणार नाही, असं म्हटलं होतं.