दत्ता कानवटे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत शिवसेना प्रमुखांचे विचार किती पोचले याची मला कल्पना नाही. आम्ही ज्या शिवसेनाप्रमुखाला बघितले आणि आम्ही त्यांच्यासोबत 38 वर्षे काम केली. त्यावेळेस शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, माझ्या सामान्य शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करेन. उद्धव ठाकरे कधी शिवसैनिक नव्हते. आम्ही ज्या वेळेस फिरायचो आणि शिवसेनेचे काम करत होतो. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांचे एकच स्वप्न होतं की शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं. परंतु इथे झाले उलटेच. इथे पुत्र मुख्यमंत्री बनला आणि पुत्राचा पुत्रही मंत्री बनला. हे महाराष्ट्र आणि शिवसेनाप्रमुखांनी हे स्वप्न कधी पाहिलं नव्हतं, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला.
शिवसेनाप्रमुखांना अपेक्षित असलेला मुख्यमंत्री पदावर बसला नव्हता. म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांना खाली खेचले आणि शिवसैनिकाला त्या खुर्चीवर बसवले. उद्धव ठाकरे यांनी महाडच्या सभेमध्ये आज जे स्टेटमेंट केले आहे, त्याच्यावर त्यांनी ठाम राहावे एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा असल्याचे शिरसाट म्हणाले.
मुख्यमंत्री दिल्ली वाऱ्या किंवा विदेश वाऱ्या करत आहेत. ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी महाडच्या सभेमध्ये एकनाथ शिंदे यांना तुम्ही मोदींचे नाव घेऊन निवडणुका लढवा मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन निवडणूक लढवतो, असे म्हटले होते.
यावर उत्तर देताना संजय शिरसाट यांनी सांगितले की, आम्ही शिवसेना प्रमुखांचे नाव विसरू शकत नाहीत. ते आमचे दैवत आहेत. आम्ही त्यांचं नाव घेऊनच पुढच्या निवडणुका लढवणार आहोत. कधीतरी फोटोग्राफी केली आणि वर आले. आम्ही तसे नाहीत. आम्ही 38 वर्षे काम केले आहे. आम्ही शिवसेनाप्रमुखांचे नाव घेऊनच निवडणूक लढवणार आहोत. तुम्हाला ते वाईट वाटत असेल तर तुम्ही शिवसेनाप्रमुखांचे नाव घेऊ नका.
उद्धव ठाकरे यांना वेळ असेल तर त्यांनी कर्नाटकमध्ये जावे. दुसऱ्याला शहाणपण शिकवू नये. तुम्हाला सभा घ्यायला कोणी रोखले आहे. संजय राऊतसारख्या टीनपाट माणसाला पाठवता. इथे बसून त्याच्यावर कॉमेंट करतात. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी कर्नाटकमध्ये सभा घेऊन दाखवावी असे आवाहन संजय शिरसाट यांनी केले.