मविआला महाराष्ट्रात दंगली घडवायच्यात, मोदींनी माफी मागितली तरी…; शिंदे गटाच्या नेत्याचं विधान चर्चेत

| Updated on: Aug 31, 2024 | 1:16 PM

Sanjay Shirsat on Mahavikas Aghadi : शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर मविआने घेतलेल्या भूमिकेवर संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर बातमी...

मविआला महाराष्ट्रात दंगली घडवायच्यात, मोदींनी माफी मागितली तरी...; शिंदे गटाच्या नेत्याचं विधान चर्चेत
महाविकास आघाडी
Image Credit source: ANI
Follow us on

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर डिसेंबर 2023 ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. मात्र उद्घाटनानंतर आठच महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. त्यानंतर सिंधुदुर्गात जे झालं. आमच्यासाठी शिवाजी महाराज हे फक्त राजा महाराज, राजपुरुष नाहीत. तर आमच्यासाठी शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे. मी आज डोकं झुकवून माझ्या आराध्य दैवतेला चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली. पण ही राजकीय माफी असल्याची टीका विरोधक करत आहेत. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय.

“मविआला महाराष्ट्रात दंगली घडवायच्यात”

शिवरायांचा पुतळा कोसळल्याचा निषेध करण्यासाची मविआ उद्या मोर्चा काढणार आहे. मात्र अद्याप या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. यावर शिरसाटांनी भाष्य केलंय. महाविकास आघाडी कोणताही विषय गांभीर्याने घेत नाही. त्यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या आहेत. जाती- जातीमध्ये दंगली घडवून आणायच्या आहेत आणि हे सगळं महायुतीमुळे घडतंय असं चित्र त्यांना निर्माण करायचा आहे. याची गुप्तवार्ता पोलिसांना पोहोचली असावी, म्हणून पोलिसांनी त्यांच्या मोर्चाला परवानगी दिली नसावी. तरी परवानगी घेऊन मोर्चा काढला आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. तर सरकार हातावर हात धरून बसणार नाही. चोख उत्तर त्यांना दिलं जाईल, असं संजय शिरसाट म्हणाले.

मोदींचा माफीनामा राजकीय नव्हे- शिरसाट

नरेंद्र मोदी यांनी कालच माफी मागितली आहे. यामध्ये कुठेही नाटकीपणा नव्हता. महापुरुषांची माफी मागताना लाज वाटण्याचं काही कारण नाही. सर्व महापुरुषांचा आदर आपण केला पाहिजे. त्यामुळे त्यांनी माफी मागितली. फुले, शाहू, आंबेडकर, सावरकर हे देखील महापुरुष आहेत. त्यामुळे सावरकरांबद्दल मोदी सभेत बोलले. काँग्रेसला त्यांच्या मताचं राजकारण करायचं आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे काम हे आग लावण्याचं काम करत आहेत, असं शिरसाट म्हणालेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एवढं राजकारण करायची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांनी माफी मागितली आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान यांनी देखील माफी मागितली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली असून यावरच राजकारण थांबलं पाहिजे. नरेंद्र मोदी हे सत्तेमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी विधानसभेची निवडणूक पाहून माफी मागितली नाही. याचा राजकारणाशी जोड लावू नये. जर तसं होत असेल तर हे महामूर्खपणाचं लक्षण आहे, असंही शिरसाट म्हणालेत.