Sambhaji Raje Chhatrapati Support Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवली सराटीत उपोषणसाठी बसले आहेत. गेल्या सात दिवसांपासून उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळली आहे. त्यामुळे स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी मनोज जरांगेंनी केलेल्या एका मागणीला जाहीर पाठिंबाही दिला.
गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी वारंवार करत आहे. तसेच आरक्षणाबद्दल चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, अशीही मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. आता यावर छत्रपती संभाजीराजे यांनी भाष्य केले. मराठा आरक्षणाबद्दल विधानसभेच्या पटलावर चर्चा होणं गरजेचं आहे, असे छत्रपती संभाजीराजेंनी म्हटले.
“अनेक मार्ग आहेत. त्यातून मार्ग निघू शकतात. म्हणून विधानसभेच्या पटलावर होऊ द्या. नुसता पाठिंबा देऊन चालणार नाही. अधिवेशन झालं पाहिजे. त्यातून मार्ग निघेल. मनोज जरांगे यांची अधिवेशनाची मागणी रास्त आहे. पाडायचं पाहू नका, आता निवडून कसं आणायचं पाहा. आमच्यासोबत नाही आला तरी चालेल पण तुम्ही सत्तेत आलेच पाहिजे. सत्ताधारी दखल घेत नसतील तर तुम्ही सत्तेत या. मला जरांगे यांची तब्येत बघवत नाही. मी राजकारणासाठी आलो नाही. गरीब मराठ्यासाठी न्याय देण्याकरता लढा उभा करतो. काल माझं मन बैचेन झालं होतं. उद्या काही गडबड झाली तर संभाजी छत्रपती पोहोचलाच नाही तिथे असं नको व्हायला”, असे संभाजीराजे म्हणाले.
विधानसभेच्या पटलावर चर्चा होणं गरजेचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. सर्वांनी मिळून मनोज जरांगे पाटलांचा गेम करू नये. फसवू नये. कॅबिनेटमध्ये निर्णय घेता येत नाही तर विधानसभेच्या पटलावर निर्णय घ्या. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली.
शिवाजी महाराज हे सर्वांचे आहे. ते अठरा पगड जात आणि बारा बलुतेदारांचे आहे. महाराजांनी सर्वांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं. एखाद्या समाजाने काही मागणी केली असेल तर काही हरकत नाही. बहुजन समाला न्याय देऊनही शाहू महाराज हे विदर्भात खामगावला मराठा शिक्षण परिषदेला गेले होते. समाजाला न्याय देण्यासाठी गेले होते. मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली तर मला बोलवा. मी लगेच येईन. चार्टेड प्लेनने येईल. लगेच येईल. आता मी काही बोलत नाही.
“पण तेव्हा छत्रपतींचा वेट्टो वापरेल. तो अधिकार वापरून मी मनोज जरांगे यांना काही गोष्टी सांगेल. आंदोलनाला गालबोट लागेल आणि हिंसाचार वाढेल असं काही करू नका. घटनात्मक अधिकाराने आंदोलन करा. उपोषण करा. दोन जातीत दोन समाजात तेढ निर्माण होईल, वातावरण गढूळ होईल असं काही करू नका. माझी सर्वांना विनंती आहे”, असेही संभाजीराजे म्हणाले.