नाशिक : राज्यातील मराठा समाजाच्या तरूणांना सारथीच्या (Sarthi Office) माध्यमातून मिळणाऱ्या सेवा या त्यांच्या जवळच्या शहरात मिळाव्या, यासाठी प्रत्येक विभागात सारथीचे कार्यालय व्हावे अशी मागणी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapti) यांनी केली होती. मुंबई येथील आझाद मैदानावर केलेल्या आमरण उपोषणात देखील सारथीच्या कार्यालयाची मागणी प्रामुख्याने मांडण्यात आली होती. या मागणीला सरकारने मंजूरी दिल्यानंतर नाशिकच्या विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी सारथीचे कार्यालय देखील निर्माण करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पार पडत आहे. त्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत प्रशासनाकडून संभाजीराजे छत्रपती यांचे नाव नसल्याने मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यावरूनच सारथीच्या कार्यालय सुरू होण्यापूर्वीच मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ निमंत्रण पत्रिकेत बदल करत संभाजीराजे यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.
संपूर्ण राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये सारथीचे विभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती.
पुणे येथे सारथीचे मुख्य कार्यालय असल्याने सारथीच्या माध्यमातून मिळणाऱ्या सेवेसाठी राज्यातील तरुणांना पुणे गाठावे लागत होते.
सारथीच्या माध्यमातून त्यांच्या शहराच्या जवळच सारथीचे कार्यालय असल्यास तरुणांची होणारी ससेहोलपट थांबेल यासाठी संभाजीराजे यांनी प्रामुख्याने ही मागणी लावून धरली होती.
संभाजीराजे यांनी केलेल्या मागणीला यश आले आणि कार्यालय सुरू होत असतांना त्यांनाच निमंत्रण का नाही ? त्यांना निमंत्रण न देता कार्यक्रम कसा होतो ? असा इशारा मराठा संघटनांनी दिला होता.
त्यानंतर मराठा संघटनांची प्रशासनाने धास्ती घेत तात्काळ निमंत्रण पत्रिकेत संभाजीराजे छत्रपती यांचे नाव समाविष्ट करून त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
दरम्यान निमंत्रण पत्रिका मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे छत्रपती हे सारथीच्या कार्यक्रमाला हजर होणार आहे.