दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर : राज्यात एकानंतर एक राजकीय नेत्यांना धमक्या येत असतानाच संभाजीनगरातही (Sambhajinagar) खळबळ माजली आहे. इथल्या एका शिंदे गटातील आमदाराला (MLA) धमकीचं पत्र आलंय. हे पत्र नेमकं कुणी पाठवलंय, त्यामागील काय हेतू आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र आमदाराने पोलिसात धाव घेतली आहे. या पत्राविषयी सविस्तर माहिती दिली असून लवकरच या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार असल्याचं या आमदाराने सांगितलंय.
संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार रमेश बोरनारे यांना हे धमकीचं पत्र आलंय. या पत्राविषयी आमदाराने सविस्तर सांगितलं. ते म्हणाले, ‘ मला धमकीचे पत्र चार दिवसांपूर्वी आले आहे. अहमदनगरहून पोस्टाने हे पत्र आले आहे. या पत्रात चार ओळींचा संदेश आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक तुम्हाला जीवे मारणार आहेत, असा मजकूर त्यात आहे. तसेच एका महिलेने हे पत्र पाठवलं असल्याचं बोरनारे यांनी सांगितलंय.
आमदार रमेश बोरनारे यांना ही धमकी कोणत्या कारणासाठी आली आहे, त्यांचा कुणाशी वाद झाला होता का, काही पूर्व वैमनस्य उफाळून आले आहे का, याचा तपास सध्या पोलीस घेत आहेत. वैजापूर पोलीस ठाण्यात आमदार बोरनारे यांनी यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे. यामागे फक्त राजकारण आहे, असा माझा अंदाज आहे. माझा वैयक्तिक कुठलाही वाद नाही. राजकीय हेतूने ही मला धमकी देण्यात आली आहे, या पत्राची चौकशी झाली पाहिजे. अहमदनगरहून टपालाने मला हे पत्र आलंय. मी या बाबत पालकमंत्री संदीपान भूमरे यांना मी बोललो आहे. दोन दिवसात मुख्यमंत्र्यांना भेटून कल्पना देणार आहे, अशी माहितीही रमेश बोरनारे यांनी दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांना धमकीचे संदेश आले आहेत. अगदी मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल आला होता. पोलीस कंट्रोल रुममध्ये हा कॉल आला होता. या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. मात्र सदर आरोपी दारुच्या नशेत होता. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही कर्नाटकातल्या जेलमधून जयेश पुजारी या आरोपीने धमकी दिल्याचं उघड झालंय. पुजारी हा सध्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत.