गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 28 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेला लढा आता अधिक तीव्र होत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. अशातच आता राजधानी दिल्लीत हालचालींना वेग आलाय. संभाजीराजे छत्रपती राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. मराठा समाजाच्या शिष्टमंडळासह संभाजीराजे केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत. दहा दिवसांआधी संभाजीरीजेंनी राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली. आता ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत.
मराठा समाजाला न्याय मिळावा. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळावं, यासाठी संभाजीराजे ही भेट घेणार असल्याचं संभाजीराजे म्हणालेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी संभाजीराजे अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. आज ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत. आज दुपारी 3 वाजता दिल्लीत केंद्रिय मागासवर्ग आयोगात अयोगाचे अध्यक्ष श्री हंसराज अहिर यांच्यासोबत भेट होणार आहे. या भेटीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असेन.
18 नोव्हेंबरला पुण्यात संभाजीराजे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाजाचे ज्वलंत प्रश्न मांडले. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळविण्यासाठी रस्त्यावरच्या लढाई बरोबरच कायदेशीर लढाई सुध्दा लढली पाहिजे, असं संभाजीराजे यावेळी म्हणाले. संभाजीराजे यांच्यासोबत मराठा आरक्षणासाठी लढणारं शिष्टमंडळही होतं. स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, उपाध्यक्ष अंकुश कदम, विनोद साबळे, आप्पासाहेब कुढेकर, रघूनाथ चित्रे, प्रशांत पाटणे, राहूल शिंदे, महादेव तळेकर, संजय पवार, गणेश सोनवणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठं आंदोलन उभं राहिलं आहे. मनोज जरांगे पाटील यासाठी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. जरांगे पाटील सध्या राज्यव्यापी दौरा करत आहेत. अशातच राज्यातही ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन दिलं जात आहे. कायदेशीर रित्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यात संभाजीराजे यांची महत्वाची भूमिका आहे.