नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोतील अधिकारी समीर वानखेडे यांनी धारावी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी तब्बल दोन वर्षानंतर समीर वानखेडे यांच्यावर टीका केली आहे. तसेच वानखेडे यांच्यावरील गुन्ह्याचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे नवाब मलिक आणि समीर वानखेडे असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समीर वानखेडे यांच्यावर दोन वर्षानंतर हल्ला चढवला आहे. समीर वानखेडे यांची नोकरी तर जाणार आहे. मी त्यांचा फर्जीवाडा उघड केला होता. तो सत्य ठरला आहे. सीबीआयने वानखेडेंवर गुन्हा दाखल केला आहे. वानखेडेंना या प्रकरणात तात्पुरता जामीन मिळाला आहे. फर्जीवाडा करणाऱ्यांना लोकं मते देणार नाहीत. त्यांची नोकरी जाणारच आहे. त्यामुळे संरक्षण मिळावं म्हणून ते राजकारणात उतरले आहेत. पण एक सांगतो, जे पेरलं तेच उगवणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
मी निवडणूक लढणारच…
नवाब मलिक यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. अजितदादा आणि भाजपचा काय निर्णय त्यांनी करावा. मी निवडणूक लढवणार आहे. लोकांच्या आग्रहासाठी निवडणूक लढवणार आहे. कोण विरोध करतो हा प्रश्न महत्त्वाचा नाही. लोकांच्या हितासाठी काम करायचं आहे. ज्यांना विरोध करायचा ते करतील, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.
तो विषय आमच्यासाठी महत्त्वाचा नाही
अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून शरद पवार गटात नाराजी सुरू आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. याबाबत मीही ऐकत आहे. टीव्हीवर पाहिलं आहे. त्याबाबत शरद पवार गटातील लोकांनी स्टेटमेंट दिलं आहे. शरद पवार गटातून कोण लढणार आणि कुणाला तिकीट दिलं हा विषय माझा नाही. आम्ही केलेली कामे आणि लोकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास या गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
ड्रग्स गँग ते चालवत आहेत
यावेळी त्यांनी समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांच्यावरही टीका केली. माझ्या मतदारसंघात 9 ड्रग्स विकणारे होते. त्यापैकी 8 तुरुंगात आहेत. एक पळाला आहे. त्यांच्या घरातील लोक धंदा करत आहेत आणि हे लोक ठिकाणी प्रचार करायला येत आहेत. समाजवादी पार्टीचे लोकं ड्रग्स गँग चालवत आहेत. त्यांनी आम्हाला शिकवू नये, अशी टीका त्यांनी केली.