मुंबई : मागच्या आठवड्यात नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. पिंपळखुटा येथे डिव्हायडरवर आदळून बस पलटी झाली. त्यानंतर बसमध्ये भीषण आग लागली होती. यात बसमधील 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. या अपघातात चालकासह आठ जणांचे प्राण वाचले होते. बसची काच फोडून बाहेर निघाल्याने या आठ जणांचे प्राण वाचले होते.
समृद्धी महामार्गावरील हा आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात होता. कारण एकाचवेळी 25 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मृतांची ओळख पटवणही मुश्किल झालं होतं, इतका हा भीषण अपघात होता.
विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती
नागपूरहून पुण्याला जाणारी ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. आता या अपघातासंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. चालकाच्या रक्ताच्या नमुन्यात 30 टक्क्याच्या वर अल्कोहोल आढळलं आहे. चालक शेख दानिश सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
मध्यरात्री 1 ते 1.30च्या सुमारास समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा येथे बस डिव्हायडरला धडकून पलटी झाली होती. प्रवाशांना बाहेर पडता येत नव्हतं. तितक्यात बसने पेट घेतला. प्राण वाचवण्यसााठी प्रवाशांनी जीवाच्या आकांताने आक्रोश केला. पण त्यांना कुणीही वाचवू शकलं नव्हतं.