पुणे | 29 जानेवारी 2024 : 12-13 वर्षांपूर्वीच्या लहान लहान गोष्टी काढायच्या आणि 2-5लाखांसाठी चौकशी करायची. ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड ब्रांच आहे. जे भाजपासोबत जात नाहीत त्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर राजकीय सूडातून कारवाई केली जात आहे. भाजपासोबत गेल्यावर कारवाी बंद केली जाते. हे चित्र देशासाठी चांगलं नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी आहे, त्यासंदर्भात बोलताना राऊत यांनी सरकारवर टीका केली.
किरीट सोमय्या यांच्यावर टीका
हा जो मुलुंडचा एक माणूस आहे, पोपटलाल, त्याने आयएनएस विक्रांत बचावच्या नावाखाली क्राऊड फंडिंग करून कोट्यवधी रुपये गोळा केले, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, खालच्या कोर्टात त्याला आणि त्याच्या मुलाला जामीन नाकारला. ते भूमीगत झाले. नंतर त्यांनी जामीन मॅनेज केला आणि सरकार आल्यावर त्यांच्यावरील एफआयआर काढून टाकला. मग हा मुलंडचा पोपटलाल कसा मोकळा ? असा सवाल विचारत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडलं.
अजित पवार यांचा ७० हजार घोटाळा, शिखर घोटाळा हे तर पंतप्रधान सांगतात. दादा भुसे, राहुल कुल यांना नोटीस का नाही पाठवली ? त्यांना नोटीस पाठवताना ईडीची शाई संपते का ? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.
राजकीय सूडबुद्धीतून कारवाई सुरू
भाजपासोबत गेलात की सगळी चौकशी बंद होते. ही सगळी जी कारवाई आहे ती राजकीय सूडबुद्धीतून सुरू आहे. पण आमच्यासारखी माणसं झुकणार नाहीत. टाका ना तुरुंगात तुम्ही, एकदा टाकून झालं आहे, परत टाका किती दिवस टाकणर, असा सवालही त्यांनी विचारला. फासावर लटकावायचचं असेल तर लटकवा, देशातील हुकूमशाही विरोधात आम्ही लढत आहोत, आम्ही मागे हटणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
राहूल नार्वेकरांवरही केली टीका
ओम बिर्ला यांनी राहूल नार्वेकर यांची राजकीय पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ‘हा सर्वात मोठा फ्रॉड आहे या देशातला.’ ज्या माणसाने आत्तापर्यंत १० पक्षांतरं केली आहेत, सहज पचवून ढेकर दिली आहे , ज्या व्यक्तीनं शिवसेनेच्या फुटीला मान्यता दिली ( जी घटनेत मान्य नाही) अशा व्यक्तीची राजकीय पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी निवड होत असेल तर तो काय महान माणूस आहे. राहुल नार्वेकर भाजपचा हस्तक म्हणून निर्णय दिला आहे, अशी टीका राऊत यांनी केली.